बेकायदा जाहिरात फलकांमुळे पुणे महापालिकेचे लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 08:12 PM2019-12-16T20:12:22+5:302019-12-16T20:16:09+5:30
बीआरटी मार्गातील स्थिती : प्रशासनाने केलेय सोयीस्कर दुर्लक्ष
पुणे : शहरातील बीआरटी मार्गांमध्ये जाहीरात फलक लावण्यास मान्यता नसतानाही विविध ठिकाणी जवळपास 38 अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असतानाही पालिकेतील वरिष्ठ आणि आकाश चिन्ह विभागाचे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत. अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरु असल्याचा आरोप होत आहे.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी लेखी प्रश्न विचारला होता. त्याला प्रशासनाने दिलेल्या उत्तरामधून ही बाब उघड झाली आहे. बीआरटी मार्गांमध्ये जाहिरात फलक उभारण्याकरिता पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची मान्यता आवश्यक आहे. ही मान्यता विभागाने दिलेली नाही. तरीदेखील अनधिकृतपणे 38 जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत.
संगमवाडी-विश्रांतवाडी या बीआरटी मार्गावर संगमवाडी अॅप, संगमवाडी डाऊन, केंद्रीय विद्यालय, डेक्कन कॉलेज, आंबेडकर सोसायटी, होमगार्ड ऑफिस, फुलेनगर मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी या ठिकाणच्या बसथांब्यांवर हे अनधिकृत जाहिरात फलक उभे आहेत. ‘येरवडा-आपले घर’ या बीआरटी मार्गावर येरवडा, गुंजन कॉर्नर, वाडिया बंगला, शास्त्रीनगर, रामवाडी जकात नाका, वडगाव शेरी फाटा, विमान नगर कॉर्नर, टाटा गार्डरूम, चंदननगर, खराडी बायपास, जनक बाबा दर्गा, वाघोली जकात नका, आपले घर या ठिकाणी अनधिकृत फलक आहेत. तर स्वारगेट ते हडपसर या बीआरटी मार्गावर वैदुवाडी अॅप, वैदुवाडी डाउन रामटेकडी अॅप आणि डाउन, काळुबाई बस स्टॉप येथे विनापरवाना जाहिरात फलक उभारल्याचे पालिका प्रशासनाने दिलेल्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
====
एरवी सर्वसामान्यांचे फलक, बॅनर्स, जाहिराती काढून टाकण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्याची तत्परता दाखविणाऱ्या आकाशचिन्ह विभागाने याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. प्रशासकीय अधिकाºयांवर राजकीय दबाव आहे की त्यांचेच हात दगडाखाली अडक लेले आहेत याबद्दल उलटसुलट चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहेत.