पुण्यातील शाळेची 'मोगलाई'; मुलींच्या अंतर्वस्त्राचा रंग, पाणी पिण्याच्या वेळेवर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 01:38 PM2018-07-04T13:38:25+5:302018-07-04T13:44:00+5:30
जाचक नियमांमुळे पालकांचा संताप
पुणे: मुलांना शाळेत शिस्तीचे धडे मिळतात. मात्र पुण्यातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेत मुलांना आयुष्यभराचा 'धडा' शिकवला जातोय का? असा प्रश्न पालिकांकडून उपस्थित केला जात आहे. पौड रोडवरील विश्वशांती गुरुकुल शाळेनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीतून शाळेनं विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याच्या आणि स्वच्छतागृहात जाण्याच्या वेळादेखील निश्चित केल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये संताप आहे.
विश्वशांती गुरुकुल शाळेनं विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या नियमावली संदर्भात पालकांना शपथपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचा उल्लेख आहे. पालकांनी नियम न पाळल्यास शाळा प्रशासनाकडून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जाऊ शकते. शाळेच्या नियमावलीतील अनेक बाबी धक्कादायक आहेत. विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याच्या, स्वच्छतागृहात जाण्याच्या वेळा नियमावलीत देण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे, तर विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाचं अंतर्वस्त्र घालावं, हेदेखील शाळेनं नियमावलीत नमूद केलं. शाळेनं विद्यार्थ्यांना दिलेल्या डायरीत हे सर्व नियम दिले आहेत. याबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शाळेच्या विद्यार्थिनींनी क्रिम किंवा पांढऱ्या रंगांचीच अंतर्वस्त्र घालावीत, असं शाळेनं नियमावलीत म्हटलं आहे. याशिवाय स्वच्छतागृहात जाण्यासाठीही विद्यार्थ्यांना वेळ निश्चित करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्यावरही शाळेनं निर्बंध आणले आहेत. हे नियम न पाळल्यास पालकांकडून दंड आकारला जाईल. याबद्दल पालकांमध्ये नाराजी आहे. 'विद्यार्थ्यांना शिस्त लावावी, याला आमचा विरोध नाही. मात्र त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरुकता निर्माण करायला हवी. तर विद्यार्थी स्वत:हून शिस्त पाळतील. शाळेनं अशा पद्धतीनं दंड आकारायला नको,' असं ज्योती निर्मळ यांनी म्हटलं. ज्योती निर्मळ यांची मुलगी चौथीत शिकते. तर आधी आलेल्या वाईट अनुभवांवरुन आम्ही या नियमांचा समावेश डायरीत केल्याचं एमआयटी समूहाच्या कार्यकारी संचालिका स्वाती चाटेंनी सांगितलं. 'पालकांना आक्षेप आल्यास त्यांनी आमच्याशी किंवा मुख्याध्यापकांशी त्याबद्दल संवाद साधला,' असंही त्या म्हणाल्या.