विराेधी पक्षांच्या आमदारांना निधी दिला जात नाही; अजितदादांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:47 PM2023-05-19T19:47:20+5:302023-05-19T19:47:38+5:30
निधीबाबत चंद्रकांत पाटलांनी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी
पुणे: ‘सत्ताधारी पक्षाकडून विराेधी पक्षांच्या आमदारांना निधी दिला जात नाही. कामांची बिलं रोखली जातात. अगदी १ मार्चच्या आधी केलेल्या कामांची बिलं पेंडिंग ठेवली जात आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न तडीस जात नाहीत’ असा शाब्दिक हल्ला करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलेच धारेवर धरले. पुढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडवावा, अशी मागणी पवारांनी केली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पुण्यातील विधान भवन येथे शुक्रवारी पार पडली. त्यावेळी ते पत्रकारांसाेबत बाेलत हाेते. या बैठकीला विराेधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके व अधिकारी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, वरती विचारल्याशिवाय बिलं काढू नका, असे आदेश ट्रेझरीला दिला गेला आहे, असे स्पष्ट करत तीन-चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना निधीची कमतरता भासते असल्याचा मुददा मांडला. राज्यात १ लाख ५ हजार कोटी रुपयांची बिले थकलेली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बिलांचाही समावेश आहे. तर, चंद्रकांत पाटील यांना मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
बैठकीला शरद पवार यांची उपस्थिती
आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अनपेक्षितपणे उपस्थित राहिली. मात्र शरद पवार यांच्यासमोरही अजित पवार यांनी आमदारांच्या प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरले. पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा दिलेला आणि परत मागे घेतलेला राजीनामा या सर्व पार्श्वभूमीवर पवार यांनी थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.