पुणे : भाजप आणि शिवसेनेच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेचे प्रचाररूपी इंजिन आगामी काही दिवस पुण्यात धडाडताना दिसेल.
पुण्यातून मनसेने कसब्यातून शहराध्यक्ष अजय शिंदे, कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून वसंत मोरे तर शिवाजीनगर मतदारसंघातून सुहास निम्हण यांना उमेदवारी दिली आहे. मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नसल्याने पक्षात काहीशी मरगळ आली होती. मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा लढवण्याबाबतही काहीसे साशंक होते. पण अखेर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या आग्रहामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. पुणे शहरात असलेल्या आठही मतदारसंघांवर सध्या भाजपची मोहोर उमटवलेली आहे. त्यातच महापालिकेतही भाजपची सत्ता असल्यामुळे सर्वत्र त्यांचेच नगरसेवक असणार आहेत. अशावेळी मनसे शहराशी निगडीत कोणते मुद्दे घेऊन उतरणार याकडे लक्ष राहणार आहे.
विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास कसब्यातून अजय शिंदे यांच्यासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हडपसरमधून वसंत मोरे यांच्यासमोर योगेश टिळेकर, कसब्यातून अजय शिंदे यांच्यासमोर महापौर मुक्ता टिळक तर शिवाजीनगरमधून सुहास निम्हण यांच्यासमोर सिद्धार्थ शिरोळे यांचे आवाहन असणार आहे. याशिवाय अजून आघाडीचे उमेदवार जाहीर होणे बाकी आहेत. त्यामुळे आता मनसे कसा लढा देते हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.