पुणे : पुणे रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट बसस्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल हिसकाविणाऱ्या दोघांना अँटी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोहित राजू पवार (वय १९, रा. भवानी पेठ, गवळीवाडा, कॅम्प) आणि राजु अनिल जाधव (वय २०, रा. भवानी पेठ, एडी कॅम्प चौक) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ गुन्हे उघडकिस आणले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी माहिती दिली़ पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट तसेच शिवाजीनगर परिसरात बाहेर गावाहून प्रवास करून आलेल्या प्रवासी बसची वाट पाहात असताना त्यांना लुटण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे़ या पार्श्वभूमीवर अॅन्टी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पथक बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी प्रवाशांचे मोबाईल हिसकाविणारे दोघे जण दुचाकीवर पुणे स्टेशन परिसरात येणार आहेत, अशी माहिती बुधवारी रात्री पोलिस नाईक अजय उत्तेकर, आणि पोलिस शिपाई राकेश खुणवे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने स्टेशनसमोरील स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर सापळा रचून दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी पुणे स्टेशन आणि स्वागरेट परिसरात रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडल्याचे कबुल केले़. त्यांच्याकडून मोपेड आणि ८ मोबाईल जप्त केले आहेत. अशा प्रकारे दोघांनी आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक फौजदार राजेंद्रसिंग चव्हाण, पोलीस हवालदार सुनिल चिखले, विजय गुरव, सर्फराज शेख, किरण ठवरे, प्रविण पडवळ, कैलास साळुंखे, निलेश शिवतरे यांनी केले़................................प्रवास करून रेल्वेस्टेशन, एस टी बसस्थानकात उतरल्यानंतर बाहेर गेल्यावर प्रवाशी नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईल बाहेर काढतात. या संधीचा गैरफायदा घेत दोघांनी मोबाईल हिसकावून नेले. राजू जाधव हा दुचाकी चालवायचा तसेच रोहित पवार हा मोबाईल हिसकाविण्याचे काम करत असत. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमीवर बेताची आहे. पवार याला दारूचे व्यसन आहे. दारुसाठी त्याने चोरलेले महागडे मोबाईल अवघ्या ५०० ते एक हजार रुपयांमध्येही मित्रांना विकले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.
दारुसाठी पाचशे रूपयांत विकले मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:37 PM
प्रवास करून रेल्वेस्टेशन, एस टी बसस्थानकात उतरल्यानंतर बाहेर गेल्यावर प्रवाशी नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईल बाहेर काढतात. या संधीचा गैरफायदा घेत दोघांनी मोबाईल हिसकावून नेले.
ठळक मुद्देप्रवाशांचे मोबाईल हिसकावणारे दोघे जेरबंद ८ गुन्हे उघडकीस : अँटी गुंडा स्कॉडची कामगिरी