चाकण परिसरात दहशत करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:04+5:302021-04-03T04:09:04+5:30
चाकणमध्ये टोळी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपी संदीप शिंदे यांच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात ...
चाकणमध्ये टोळी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपी संदीप शिंदे यांच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. चाकण येथील संदीप अरुण शिंदे (वय ४२), ओंकार मनोज बिसणारे (वय २०) निखिल ऊर्फ दाद्या रतन कांबळे (वय २०) नामदेव प्रकाश नाईक (वय २०) हर्षद संदीप शिंदे (वय २२) आणि चाकण भागातीलच सहा अल्पवयीन मुलांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी मारामारी, दरोड्याची तयारी, वाहनांची जाळपोळ ,बेकायदेशीर अग्नी शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे चाकण आणि भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्यानुसार ती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाकड येथील सराईत गुन्हेगार सुरज चौधरी या टोळी प्रमुखासह एकूण सहा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी ३१ मार्च रोजी दिले आहेत.