व्यावसायिकांना धमकाविणारी टोळी चालविणाऱ्या वकील महिलेवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:09+5:302021-04-28T04:10:09+5:30
पुणे : मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील टोळीप्रमुख अॅड. दीप्ती काळे हिच्याविरोधात आणखी ...
पुणे : मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणातील टोळीप्रमुख अॅड. दीप्ती काळे हिच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दीप्ती काळे आणि नीलेश शेलार यांच्यावर मोक्का लावला आहे.
अॅड. काळे हिने इतरांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकांशी शारीरिक जवळीक साधून त्यांच्याकडून जबरदस्तीने ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. तसेच आणखी ५८ गुंठे जमीन नावावर करून देण्यासाठी धमकाविल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीप्ती सरोज काळे (रा. बावधन), नीलेश शेलार (रा. कोथरूड), नितीन हमने व दोघा अनोळखी व्यक्तीविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील त्यांच्या सोसायटीत २०१९ पासून जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. मराठे ज्वेलर्सचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावर बेतलेली हकीकत कथन केली. या बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. या महिलेने फिर्यादीच्या पतीशी जवळीक साधली. त्यांना बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले. त्या बदल्यात त्यांचे पतीकडून मरकळ, कोयाळी येथील १०० गुंठे जमिनीपैकी प्रथम २६ गुंठे व त्यानंतर १६ गुंठे अशी एकूण ४२ गुंठे अशी ३ कोटी रुपयांची जमीन तिच्या नावावर करायला भाग पाडले. त्यानंतर उरलेली ५८ गुंठे जमीन तिच्या नावावर करून दे नाही, तर तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला आयुष्यभर जेलमध्येच सडवेल, अशी धमकी दिली. नीलेश शेलार व नितीन हमने यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण केली. या महिलेच्या नावावर ५८ गुंठे जमीन करून द्या, नाही तर तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच या महिलेने तिचे व फिर्यादीच्या पतीचे एकत्रित असलेले फोटो पाठवून मानसिक त्रास दिला. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी तयार करून उपायुक्त प्रियंका नारनवर यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर केला होता. डॉ. शिंदे यांनी त्याची छाननी करून त्याला मंजुरी दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
बेकायदेशीर सावकारीतील पैसा देऊन दामदुपटीने व्याज
मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना बेकायदेशीर सावकारीतून मिळालेला पैसा व्याजाने देऊन त्यांच्याकडून दामदुपटीने व्याज घेतले. प्रसंगी व्याजापोटी दुकानातील सोने उचलून नेल्याप्रकरणी दीप्ती काळेसह नीलेश शेलार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १० वर्षांत संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून प्रत्येक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, कट करून खंडणी व बनावट व्हिडिओ तयार करून अपलोड करणे असे गुन्हे केले आहेत.