बारामती : वेळ सकाळी १०.३०ची...बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचा फोन खणखणतो..अटक केलेला अतिरेकी तात्काळ सोडुन दया अन्यथा आत बसलेल्या मंत्री महोदयांसह विमान उडवुन देवु ,अशी धमकी फोनवर देण्यात येते. गोजुबावी परीसरातील विमानतळावरुन तेथील कर्मचारी तावरे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना फोन दवारे हा संदेश कळवितात. या कॉलनंतर पोलीस प्रशासन अॅलर्ट होते. आपली कुमक पोहोच करत प्रवाशांना सुखरून बाहेर काढल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडतात. वास्तविक हा प्रसंग खरा नसून पोलिसांनी केलेले विमान अपहरण विरोधी प्रात्यक्षिक होते.
मात्र, हा प्रसंग अक्षरश: खराखुरा अपहरणाचा भास देऊन गेला. यामध्ये पोलिसांनी दाखवलेल्या अपहरण नाट्यानुसार पोलीस निरीक्षक ढवाण यांनी तात्काळ ही बाब नियंत्रण कक्षाला कळवली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना माहिती देत उपविभागातून मदत मागविण्यात आली. पोलिस निरीक्षक ढवाण हे अन्य आसपासच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मागवत विमानतळाकडे रवाना झाले. पुण्यातील मुख्यालयातून क्युआरटी पथक, बीडीडीएस पथक, श्वानपथक तातडीने बारामती विमानतळाकडे रवाना झाले.
पोलिसांनी विमानतळाचे मुख्य प्रवेशद्वार, अॅप्रोन गेट, कार्व्हर एव्हीएशनचे गेट बंद करत विमानतळावर कोणी जाणार नाही, याची दक्षता घेतली. कार्व्हर एव्हीएशनच्या इमारतीवर स्नायपर ठेवण्यात आले. स्नायपरकडून अपहरणातील दोन अतिरेक्यांवर फायरिंग करत त्यांना ठार केले. त्यानंतर क्युआरटी पथकाने विमानातील दोन अतिरेक्यांना जीवंत ताब्यात घेतले. बीडीडीएस, श्वानपथकाने आपली कामगिरी केली. रेस्क्यु टीमने दोघांना ताब्यात घेत विमानातील मंत्री महोदयांना सुखरु बाहेर काढले. तेथे आपत्कालीन स्थितीत प्रवाशांचा जीव वाचू शकतो, याची रंगीत तालिम पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक खंदारे हे ही या मॉकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. दीड तास हे मॉकड्रील सुरु होते.