'फाळणी वेदना स्मृती दिन' पाळण्याऐवजी मोदींनी 'महापश्चाताप दिन' पाळावा : काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 08:47 PM2021-08-16T20:47:17+5:302021-08-16T21:06:58+5:30
फाळणीपेक्षा टाळेबंदीत जास्त हाल
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळला जाणार असल्याची घोषणा केली. आता काँग्रेसनेनरेंद्र मोदींच्या याच घोषणेवर जोरदार टीका केली आहे. यात 'फाळणी वेदना दिन' पाळण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी देशभर टाळेबंदी जाहीर केली तो दिवस 'महापश्चाताप दिन' म्हणून पाळावा अशा शब्दात काँग्रेसने निशाणा साधला आहे.
भारत -पाकिस्तान फाळणीची घटना वेदनादायी होती. तिरस्कार व हिंसाचारामुळे आमच्या लाखो बहिणी आणि भावांना विस्थापित व्हावे लागले होते.ही वेदना कधीही विसरता येणार नाही. या घटनेत अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते असे मोदी यांनी ट्विटमध्ये विशद करत १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृती दिन' म्हणून पाळला जाणार असल्याचे जाहीर केले होते. याच घोषणेवर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी टीकास्र सोडले आहे.
तिवारी म्हणाले, फाळणी ही तत्कालीन अपरिहार्य घटना होती. त्यात दोन्ही बाजूंचे दीड कोटी लोक बाधीत झाले. त्या जखमांवरची खपली सतत काढत राहणे हा भाजपाचा नेहमीचा उद्योग आहे.
आताही मोदी यांनी तेच केले असे स्पष्ट करताना तिवारी म्हणाले, स्वतंत्र भारतात मोदी़नी पंतप्रधान म्हणून तुघलकी आवेशात एका रात्रीत कोणालाही कसलीही पूर्व कल्पना न देता जी टाळेबंदी केली त्यात आपल्याच देशातले साडे आठ कोटी स्थलांतरीत बाधीत झाले. पायी घरी निघाले, त्यात त्यांचे खाण्याचे राहण्याचे हाल झाले. काहींना म्रुत्यूही आला. त्यामुळे मोदी व त्यांच्या भाजपाने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला नकाराश्रू ढाळण्याऐवजी तुघलकी टाळेबंदी जाहीर केली. तो २४ मार्च हा दिवस 'महापश्चाताप दिन' म्हणून यापुढे दरवर्षी पाळावा.
काय म्हणाले होते मोदी....
फाळणीमध्ये विस्थापित व्हावे लागलेल्या आणि प्राण गमवाव्या लागलेल्या आमच्या लाखो बंधू भगिनींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जाणार असल्याचे जाहीर केलं. १४ ऑगस्ट हा दिवस आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही,तर यामुळे एकता ,सामाजिक सद्भावने आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे मोदी म्हणाले होते.