Pune Crime: लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: December 4, 2023 12:36 PM2023-12-04T12:36:08+5:302023-12-04T12:38:16+5:30
ही नाना पेठेत जून २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वारंवार घडल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे...
पुणे : शहरात दिवसेंदिवस घरफोडी, चोरी या घटनांसह महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. अशाच एका घटनेत विवाहितेलाच लग्नाची मागणी घालून, तीने नकार देताच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही नाना पेठेत जून २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वारंवार घडल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.
सनी अनिल गायकवाड (रा. अशोक चौक, नाना पेठ) असे विवाहितेला त्रास देण्याऱ्या आरोपीचे नाव आहे. तर आरोपी सनी गायकवाड याच्या काकाने देखील १ डिसेंबर रोजी समर्थ पोलिस ठाण्यात विवाहित महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय फिर्यादी महिलेचे लग्न झाले असून आरोपी सनी गायकवाड याने वेळोवेळी त्यांच्या घरी येऊन लग्नाची मागणी घातली. महिलेने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला असता सनी याने बघुन घेण्याची धमकी दिली. तसेच अल्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपी सनी गायकवाड याच्या ८३ वर्षीय काकांनी दिलेल्या फिर्यादीत, पुतण्या सनी याचे महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. महिलेने त्याला भेटण्यास नकार दिल्याने तो महिलेच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी महिलेचा पती त्याठिकाणी आला. पत्नीला भेटण्यासाठी आल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. महिलेच्या पतीने त्यांच्या पुतण्याला शिवीगाळ करुन हाताने बेदम मारहाण केली. तसेच त्याठिकाणी पडलेला दगड त्याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय कुमार गोरद करत आहेत.