पुणे : गेले तीन ते चार दिवस रखडलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्यात आणखी प्रगती केली असून, गुरुवारी सबंध राज्यात मॉन्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापण्याची सरासरी तारीख १५ जून आहे. सध्या मॉन्सूची उत्तर सीमा आता पोरबंदर-भावनगर-खंडवा-गोंदिया -दुर्ग-भवानीपटना- कलिंगपट्टनम अशी झाली आहे. तर, रविवारनंतर राज्यात दोन दिवस मॉन्सूनचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “रविवार, १९ जूनपासून राज्यात काही दिवस विशेषतः कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात (पुणे जिल्हा/शहरासह) मॉन्सूनचा पाऊस हळुहळू वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणारे पश्चिमी वारे अधिक जोमदार झाले आहेत. त्यामुळे राज्यातील हवेत पुरेसा ओलावा निर्माण होणार आहे. तसेच किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टाही तयार होत आहे. परिणामी पाऊस वाढण्याची शक्यता आहे.”
“पुणे जिल्ह्यात, तसेच शहरात प्रथमच मॉन्सून १९ जूनपासून सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि २० जूनपासून २-३ दिवस त्याचा जोर वाढेल. तर २१ व २२ जून दरम्यान पुणे शहर, जिल्हा व आसपासच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. बंगालच्या उपसागरातूनही आर्द्रता येत असल्याने मराठवाडा, विदर्भातही रविवारपासून पावसाचे प्रमाण वाढेल,” असेही त्यांनी सांगितले.