Monsoon 2022 | महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:09 PM2022-06-03T13:09:05+5:302022-06-03T13:11:32+5:30
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
पुणे: अंदमान समुद्र व परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्याने आग्नेय उत्तर प्रदेशापासून नागालॅण्डपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम असा सक्रिय आहे. तसेच बंगाल ते आंध्रप्रदेशपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर विदर्भात तीन दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस सुरू असतानाच, विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची आणि कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी २४ तासांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला. चंद्रपूर येथे कमाल तापमान ४६.८ तर महाबळेश्वर येथे नीचांकी तापमान १७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.