दत्तगड परिसरात फुलली पंधरा हजारांहून अधिक देशी झाडं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:09 AM2021-07-20T04:09:03+5:302021-07-20T04:09:03+5:30

पुणे : चार वर्षांपूर्वी दिघीतील डोंगर म्हणजेच दत्तगडावर मोकळं रान होतं. पण तिथं येणाऱ्यांनी वनराई साकारण्याचा निर्धार केला ...

More than fifteen thousand native trees bloomed in Dattagad area | दत्तगड परिसरात फुलली पंधरा हजारांहून अधिक देशी झाडं

दत्तगड परिसरात फुलली पंधरा हजारांहून अधिक देशी झाडं

Next

पुणे : चार वर्षांपूर्वी दिघीतील डोंगर म्हणजेच दत्तगडावर मोकळं रान होतं. पण तिथं येणाऱ्यांनी वनराई साकारण्याचा निर्धार केला आणि सलग शंभर दिवस वृक्षारोपणासाठी मेहनत घेतली. पण नंतर सर्वांना आवड निर्माण झाली आणि हा उपक्रम कायमच सुरू ठेवला. म्हणूनच संस्थेचे नावही ‘अविरत श्रमदान’ असेच ठेवले आहे. आजअखेर डोंगराच्या परिसरात सुमारे १५ हजारांहून अधिक देशी झाडं फुलत आहेत.

दिघीच्या डोंगराला काह्यगिरी असेही नाव आहे. ‘अविरत श्रमदान’च्या टीममध्ये ॲड. सुनील कदम, जितेंद्र माळी, धनाजी पाटील, मोहन कदम, धनंजय अंबिके आदींचा समावेश आहे. दोनशेहून अधिक जणांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांमध्ये रोपांसाठी खड्डे खोदणे, रोपं लावणं, त्यांना जगविणे आदी कामे होत आहेत. झाडं वाढल्यानेे अनेक पक्षीही येऊ लागले आहेत. पक्ष्यांचे खाद्य असणारी झाडं असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात. सध्या तुती मोठ्या प्रमाणावर फुलली आहे. डोंगराचा परिसर आर्मीचा आहे. संस्थेकडून चांगले काम होत असल्याने त्यांना या ठिकाणी झाडं लावण्याची परवानगी दिली.

—————————————

देशी झाडांची लागवड

उन्हाळ्यात येथे पाण्याची सोय नव्हती. तेव्हा कॅनने पाणी आणून या झाडांना जगविले. त्यानंतर काही संस्थांच्या मदतीने ठिकठिकाणी टाक्या ठेवून पाइपने पाण्याची सोय केली. आता सुमारे पंधरा हजार झाडं चांगली वाढली आहेत. त्यात वड, पिंपळ, करंज, शिवण, तुळसाचे बेट, कडुनिंब अशी देशी झाडे आहेत, असे धनाजी पाटील यांनी सांगितले.

———————————

आम्ही झाडं लावल्यानंतर अनेकदा जनावरं ती मोडायची, तेव्हा मोडलेली झाडंही आम्ही जगवली आहेत. माणूस जखमी झाला तर आपण त्यावर उपचार करतो. तसेच झाडं कोलमडली, पडली, तर त्यांना आम्ही मलमपट्टी करून जगवतो. अशी अनेक झाडं जगली आहेत. त्यांना एका काठीने बांधून उभे केले जाते.

- जितेंद्र माळी, अविरत श्रमदान

———————————-

झाडं लावणं सोपं काम आहे. पण ती जगवणं खूप कठीण आहे. आम्ही रोपं लावली आणि ती जगवली. या झाडांमुळे डोंगरावरील माती थोपून राहिली आहे. अन्यथा पूर्वी ही माती थेट खाली यायची. तसेच डोंगराच्या आजूबाजूच्या घरांमधील बोअरला डिसेंबरपर्यंत पाणी असायचे. त्यानंतर पाणी बंद व्हायचे. आता या झाडांमुळे जलस्तर वाढला आहे. बोअरला बारा महिने पाणी राहत आहे.

- ॲड. सुनील कदम, अविरत श्रमदान

———————————-

Web Title: More than fifteen thousand native trees bloomed in Dattagad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.