पुणे : नागरी सहकारी बँकांमधे पाच वर्षांत २२० कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याची माहिती विपर्यस्त असून, घोटाळ्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकाच आघाडीवर असल्याचे आकडे महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाने दिले आहेत. केवळ २०१८-१९ या वर्षात ७१ हजार ६६१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांपैकी ६५ हजार ५०९ कोटींचे घोटाळे राष्ट्रीयकृत बँकांतच झाल्याचे महासंघाने सांगितले.
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात पाच वर्षांत १ हजार गैरव्यवहार झाले असून, त्यात २२० कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, नागरी बँकांमध्ये खळबळ माजली. या वृत्ताचे नागरी सहकारी बँक महासंघाने खंडन केले. प्रसिद्ध माहितीनुसार, नागरी बँकिंग क्षेत्रात १९१८-१९ मध्ये १८९ प्रकरणांमध्ये १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यात कॉसमॉस बँकेतील सायबर हल्ल्यातील ९४ कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र, याला घोटाळा म्हणता येणार नाही. ही रक्कम वजा केल्यास १८० प्रकरणांमध्ये ३३ कोटी ७० लाख रुपये गुंतले आहेत. सरासरी १८ लाख रुपये प्रत्येक प्रकरणामध्ये गुंतले आहेत, असा दावा महासंघाने केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल, २०१९ ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत राष्ट्रीयकृत बँकामध्ये ९५ हजार ७०० कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. यातील प्रकरणांची संख्या ५ हजार ७४३ इतकी असून, प्रत्येक प्रकरणामध्ये सरासरी १७ कोटी रुपये गुंतले आहेत. यात स्टेट बँक आॅफ इंडियाचा सर्वाधिक २५ हजार ४०० कोटी रुपयांचा वाटा आहे.गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) राष्ट्रीयकृत बँकांमधील घोटाळा ७१ हजार ५०० कोटी रुपयांचा होता. केंद्र सरकारने त्यांना७० हजार कोटी रुपयांची भांडवली मदत केली होती. त्यापूर्वीच्या (२०१७-१८) आर्थिक वर्षात घोटाळ्याची रक्कम ४१ हजार १६७ कोटी रुपये होती. केवळ दीड वर्षांत ही रक्कम दुप्पट झाली.अशी टीका करणे अयोग्यराष्ट्रीयकृत, खासगी, परदेशी आणि इतर आर्थिक संस्थांमधील घोटाळ्यांची तुलना केल्यास नागरी सहकारी बँकांचे प्रमाण अल्प ठरते. केवळ नागरी बँकांची प्रसिद्धी देणे योग्य नसल्याचे मत, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.