पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे आॅक्सिजनच्या ‘व्हेंटीलेटर’च्या अभावी अनेक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आॅक्सिजन व्हेंटीलेटरला मागणी वाढली आहे. पण नैसर्गिक आॅक्सिजनचे ‘व्हेंटीलेटर’ तयार करून त्याचा शेकडो नागरिक लाभ घेत आहेत. म्हातोबा टेकडीलगतच हा ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्यात आला आहे. एका व्यक्तीपासून झाडे लावण्याच्या उपक्रमाला सुरवात झाली आणि आज अनेकजण एकत्र आले आहेत. शंभरहून अधिक देशी वृक्ष येथे बहरत असून, ते शुध्द आॅक्सिजनचे ‘व्हेंटीलेटर’च आहेत.
म्हातोबा टेकडीच्या लगत राहुल टॉवर्स ही मोठी सोसायटी आहे. त्या ठिकाणी निसर्गप्रेमी मकरंद शेटे राहतात. त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. या विषयी शेटे म्हणाले,‘‘ मी ‘वनचारी’ असा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आहे. आम्ही सर्व जण अनेक वर्ष या टेकडीवर काम करत आहोत. पाच-सहा वर्षांपूर्वी रोपं लावायला सुरवात केली. देशी वृक्षांवर भर देऊन घरून पाणी आणून या रोपांना जगवले आहे. सुरवातीला काही लोकांनी तर काही प्राण्यांनी रोपांचे खूप नुकसान केले. पण आम्ही हरलो नाही. परत रोपं लावली आणि ती जगवली. आता या झाडांवर धनेश, पोपट, रॉबिन असे अनेक पक्षी येत आहेत.
या कामासाठी तुषार कासार, सुधीर संचेती,अमोल टोपे, संदीप काळे, शिव, गुंजन, विठ्ठल ऐनापुरे, उदय टोळ, विनोद कुलकर्णी, हेमंत वाघ, मंदार गरुड, महेश गोखले, मनीषा गरुड, डॉ. मेदिनी डिंगारे, डॉ. अतुल कुलकर्णी, अॅड. विंदा महाजन, आनंद मोकाटे यांची मदत मिळत असून, नगरसेवक किरण दगडे पाटील यांचीही नेहमी साह्य होते.’’ ====================आमची राहुल टॉवर्स नावाची मोठी सोसायटी आहे. त्याच्या शेजारीच ही जागा आहे. वन विभागाने त्यांची सीमाभिंत उभी केली आणि त्याच्या बाजूला मोकळी जागा होती. त्यावर वृक्षारोपण करण्याचे ठरवले. पाच वर्षांपूर्वी झाडं लावण्यास सुरवात केली. आज त्या ठिकाणी शंभरहून अधिक देशी वृक्ष बहरत आहेत. काही वर्षांनी येथे घनदाट जंगलच तयार होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. - मकरंद शेटे, निसर्गप्रेमी ===========================देशी झाडांना बहर वड, पिंपळ, चिंच, जांभूळ,आपटा, बिजा, उंबर, गोरखचिंच, बेल, वावळ, शिवण, शिसव, करंज, कांचन , मोह, खुडा, हळदू, सीताफळ, पेरू, बहावा, काटेसावर, मुचकुंद, पांगारा, आवळा, रिठा, कडुनिंब, बकानीम, कदंब, आंबा, चिंच, रबर आदी शंभरहून अधिक झाडे आज बहरत आहेत. =======================