पुणे : केंद्रीय प्रवेश समितीने सहा महाविद्यालयांमध्ये जादा वर्गचा निर्णय घेतला असला, तरी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्यच या निर्णयाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. सहा महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयातील प्राचार्यांशी याबाबत संपर्क साधला असता, समितीकडून अद्याप विचारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जागा वर्गांबाबत घाई करणारी समिती किती गंभीर आहे, हेच स्पष्ट होते.अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सहा महाविद्यालयांमध्ये जादा वर्ग घेतले जाणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, हा निर्णय घेताना संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा व्यवस्थापनाशी चर्चाच केलेली नाही. विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी संबंधित सहा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. रात्री उशिरापर्यंंत या निर्णयाबाबतची माहिती संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांपर्यंत पोहचली नाही. समितीने बुधवारपासूनच जादा वर्ग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाविद्यालयांना माहितीच नसल्याने हे वर्ग बुधवारपासून सुरू होण्याची शक्यता कमी आहे.(प्रतिनिधी)समितीच्या निर्णयाविषयी सहा महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विचारले असता ते म्हणाले, रात्री उशिरापर्यंत समितीकडून याबाबतची काहीही माहिती देण्यात आलेली नाही. विद्यार्थिहितासाठी महाविद्यालय जादा वर्ग घेण्यासाठी तयार आहे. मात्र, त्याबाबत पुरेसे नियोजन करणे आवश्यक आहे. बुधवारपासून लगेचच वर्ग सुरू करणे अशक्य आहे. समितीने व्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेणे अपेक्षित होते. त्यातून विविध पर्यायांवर विचार झाला असता. हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. एका महाविद्यालयात किती विद्यार्थी येणार, हेही निश्चित नाही.
समितीला जादा वर्गांची घाई
By admin | Published: July 27, 2016 3:57 AM