अनधिकृत डीजेवाल्यांचा आवाज अधिक; इलेक्ट्रिकल आणि जनरेटर्स असोसिएशनचे स्पष्टीकरण
By श्रीकिशन काळे | Published: October 5, 2023 01:28 PM2023-10-05T13:28:17+5:302023-10-05T13:28:27+5:30
पुण्यात २ हजार व्यावसायिक आहेत, हानिकारक लेझर - डीजेचा वापर अनधिकृत डीजेवाल्यांनी केला
पुणे : योग्य परवानाधारक असलेल्या लेझर, डीजेची रेंज १५० फूट असते. लोकलची रेंज १ किलोमीटरवर जाते. लोकल काही अनधिकृत लोकं त्यांचा डीजेचा ब्रॅण्ड आहे, असे बोलतात पण तो नसतो. मंडळे आहेत ५ हजार आणि आम्ही व्यावसायिक २ हजार आहोत, त्यामुळे पुण्याबाहेरील लोकांनी लेझरचा वापर अधिक केला आणि त्यांचा आवाज अधिक असतो, असे स्पष्टीकरण इलेक्ट्रिकल आणि जनरेटर्स असोसिएशनने दिले.
ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर साऊंड अँड इल्क्ट्रीकल्स जनरेटर्स असोसिएशन, पुणेची भूमिका मांडण्यासाठी गुरूवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष बबलू रमजानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेचे सभासद ४००-५०० आहेत. काही जणांनी वेगळी संघटना काढली आहे. डेसिबलचा नियम आम्ही पाळू शकत नाही. कारण आता औद्योगिक ठिकाणी ७५ डेसिबलपेक्षा अधिक डेसिबल असते. पण आम्हाला मग आमचे डेसिबल कमी करता येत नाही. आम्ही ५५ डेसिबलवर कसं चालवणार डीजे?गणेशोत्सवात काही लोकं मोठा आवाज ठेवतात. कर्कश्श आवाज करतात. त्याविरोधात आम्ही पण आहे. प्रेसर बीड हे घातक आहे. ते अनेकजण वापरतात. अनधिकृत डीजेवाले लोकं ते वापर करतात. आम्ही याविषयी संबंधितांना निवेदन दिले आहे. पण ते ऐकत नाहीत. लेझर लगेच मिळते. त्याचा वॅट १० ते २० वॅट आहे. आपल्याला ५ वाॅटचे हवे. त्यावर निर्बंध आणले पाहिजेत. ९० टक्के चायना मेड असतात. त्यावर बंदीच आणली पाहिजे.
यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईटस यांच्या अतिरेकी वापरामुळे पुणेकरांपासून प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा आदी घटकांवर विपरीत परिणाम झाला. प्रसिद्धी माध्यमांपासून सर्व सामान्य पुणेकरांनी या आवाज आणि लेजर लाईटच्या अनियंत्रित आणि निर्बंधमुक्त वापरा विरोधात निषेधार्ह आणि टीकात्मक भुमिका घेतली. पंरतू चोर सोडून संन्याशालाच फाशी या उक्ती प्रमाणे सर्वच डीजे व्यावसायिकांना एकाच तराजूत तोलून सर्वांना गुन्हेगाराच्या कठड्यात उभे केले जाते आहे, परंतू वास्तव फार वेगळे आहे , सब घोडे बारा टक्के या उक्तीप्रमाणे नियमांत आणि नियंत्रणात पिढ्यान पिढ्या सचोटीने शास्त्रीय पद्धत्तीने कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करणारे सुद्धा भरडले जात आहेत, अशी भूमिका साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन, पुणे यांनी मांडली.