पुण्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहा हजारांपेक्षा अधिक घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 08:24 PM2020-03-11T20:24:59+5:302020-03-11T20:25:19+5:30
अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार
पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खराडी, हडपसर व वडगाव खुर्दमध्ये उभारण्यात येणाºया ८ प्रकल्पांमध्ये ३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ६ हजार २६४ सदनिका बांधण्यात येत आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात ही घरे उपलब्ध करून देण्यात येतील. पुणे शहरातील २१ रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक जागांच्या बदल्यात महापालिका एफएसआय, टीडीआर व क्रेडिट बॉण्ड देणार आहे. तसेच, काही रस्ते पीपीपीच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारने पुणे शहरातील ८ सविस्तर गृहप्रकल्प अहवालांना मान्यता दिली आहे. यातील खराडीत ७८६, हडपसरमध्ये ३४० व वडगाव खुर्दमध्ये १ हजार १०८ सदनिका बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
कोरेगाव पार्कमधून जाणारा बंडगार्डन ते मुंढवा पुलापर्यंतचा रस्ता, कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, खराडीतील रॅडिसन हॉटेल ते सर्व्हे नं. ६० दरम्यानचा रस्ता, खराडी बायपास ते खराडीगाव, खराडीतील सर्व्हे नं. ६० ते राजारामनगर, खराडीतील सर्व्हे नं. ४, ३८, ३९, ४०, ४१, खराडी दर्गा, खराडी डीपी रस्ता ते नगररस्ता, खराडी डीपी रस्ता ते पठारे चौक, खराडी बायपास ते बी. टी. कवडे रस्ता, खराडी रस्ता ते रेल्वे बायपास अशा एकूण ११ रस्त्यांच्या विकासासाठी २८ कोटींची तरदूत केल्याचे सांगितले.
.............................
भूसंपादनासाठी ‘क्रेडिट नोट’चा नवा पर्याय
पुणे महापालिका सार्वजनिक हितासाठी आरक्षित केलेल्या जागांच्या मोबदल्यात खासगी जागामालकांना एफएसआय, टीडीआर अथवा विशेष बाब म्हणून पैशांचा मोबदलाही देते. या पर्यायांबरोबरच आता जागेच्या मोबदल्यात रेडी रेकनरच्या दराप्रमाणे क्रेडिट बॉण्ड अथवा क्रेडिट नोटही जागामालकांना मिळवता येईल. या क्रेडिट नोटचा वापर करून संबंधित जागामालकाला मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) अथवा पालिकेची इतर देणी देता येतील, असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक यांनी सांगितले.
०००