भानुदास पऱ्हाड
आळंदी : खेड तालुक्यात वातावरणातील बदलामुळे डोळे येण्याची साथ आली आहे. विशेषतः तीर्थक्षेत्र आळंदीत डोळे येण्याची साथ जास्त प्रमाणात पसरलेली असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही साथ पसरली आहे. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डोळे आलेल्या विद्यार्थ्यांनी आजारातून बरे होईपर्यंत शाळेत येऊ नये अशा सूचना खेड तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाच्या सतर्कतेने तालुक्यातील डोळ्यांची साथ आटोक्यात येऊ लागल्याचे चित्र आहे.
मागील दोन - तीन आठवड्यांपासून खेड तालुक्यात डोळे येण्याची साथ पसरली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुला - मुलींचे डोळे आल्याची संख्या जास्त आहे. त्यानंतर सोळा वर्षे वयोगटापुढील नागरिकांमध्येही ही साथ पसरली आहे. यामध्ये आळंदी ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्रात आजपर्यंत सुमारे आठ हजारांहून अधिक जणांचे डोळे आले आहेत. तर संपूर्ण तालुक्यात आजअखेर १० हजार ३६९ जणांना डोळ्यांचा संसर्ग आजार झाला आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासन व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या उपचार सेवेनंतर तालुक्यातील ९ हजार २४७ जण डोळ्यांच्या आजारातून बरे झाले आहेत.
साथीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ३० व जिल्हा परिषदेच्या ८ पथकांकडून मुलांची तसेच नागरिकांची तपासणी केली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून खेड तालुक्यातील शाळा, आश्रमशाळा व अंगणवाडीतील मुलांचा सर्व्हे करून तपासणी करण्यात आली आहे. डोळ्यांची लागण झालेल्या रुग्णांना तत्काळ औषधे देण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.
साथीचा प्रसार कसा होतो : डोळ्यांच्या साथीचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे - डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा, सौंदर्यप्रसाधने याचा वापर केल्याने होतो.
आजाराची लक्षणे
डोळ्यांची जळजळ होणे, डोळे दुखणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापण्या चिकटणे, डोळ्यांना प्रकाश सहन न होणे.
डोळे आल्यास काय करावे
डोळ्यांची स्वच्छता राखावी. डोळ्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा. आपला रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स अथवा इतर वस्तू इतरांना वापरण्यास देऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेत. लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळे आल्याची लक्षणे आढळून आल्यास वेळीच नेत्रचिकित्सकांकडून डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
अनेक शालेय विद्यार्थ्यांचे डोळे आले
तालुक्यात डोळ्यांची साथ पसरली आहे. अनेक शालेय विद्यार्थ्यांचे डोळे आले होते. तर अजूनही काही जणांचे डोळे येत आहेत. खबरदारी म्हणून संबंधित विद्यार्थ्यांनी शाळेत न येता घरीच उपचार घ्यावेत तसेच विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनी मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. - अमोल जंगले, गटशिक्षणाधिकारी.
सद्यस्थितीत ही साथ आटोक्यात
आळंदीत मोठ्या प्रमाणात डोळ्याची साथ पसरली आहे. सद्यस्थितीत ही साथ आटोक्यात आली आहे. आमच्या शाळेत पाच हजारांहून अधिक विद्यार्थी संख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. साथीचा आजार झालेले विद्यार्थी घरी उपचार घेत आहेत. त्यामुळे साथ आटोक्यात येण्यास मदत होत आहे. - अजित वडगावकर, सचिव, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था.