CBI Raid in Pune: डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम

By नम्रता फडणीस | Published: June 13, 2023 08:11 PM2023-06-13T20:11:50+5:302023-06-13T20:12:21+5:30

४७ लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याचे सीबीआयच्या प्रथमदर्शी तपासात समोर आले...

More than 47 lakhs in 17 accounts of relatives including anil Ramod CBI Raid in Pune | CBI Raid in Pune: डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम

CBI Raid in Pune: डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम

googlenewsNext

पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड व त्याच्याजवळच्या नातेवाइकांच्या १७ बँक खात्यांत ४७ लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याचे सीबीआयच्या प्रथमदर्शी तपासात समोर आले आहे. रामोड याने तीच मोडस ऑपरेंडी वापरून अवाजवी फायदा घेण्याच्या दृष्टीने हे पैसे स्वीकारले आहेत का? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, आरोपीला बाहेर सोडले तर पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याबरोबरच कर्मचारी व साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. तसेच त्याच्या कार्यालय व इतर ठिकाणाहून पुरावे जमा करायचे असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी सीबीआय कोर्टाकडे केली. ती विनंती मान्य करीत सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांनी रामोड याला दि. २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे रामोड याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. रामोड याच्या जामिनासाठी अर्ज केला जाणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्याच्या प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याची भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) लवाद म्हणून नियुक्ती केली होती. सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांतील प्रकरणे रामोड याच्याकडे आहेत. भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यात रामोड याने टक्केवारी मागितली होती. त्यामुळे या प्रकरणात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर आठ लाख रुपयांची लाच घेताना रामोड याला पकडले होते. सीबीआयच्या तपासात डॉ. रामोड याच्या बाणेर येथील बंगल्यातून सीबीआयच्या पथकाने कागदपत्रे तसेच सहा कोटी ६४ लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच त्याच्या ऑफिस केबिनमधून १ लाख २६ हजार रुपयेही सापडले. प्राथमिक तपासात रामोड याच्यासह त्याच्या नातेवाइकांच्या एकूण १७ खात्यांमध्ये ४७ लाख रुपयांची रक्कम असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. हे पैसे कुठून आले? अजून कुठे बेकायदेशीर मालमत्ता व रक्कम याची त्याच्याकडून चौकशी करायची असल्याने सीबीआय तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची विनंती न्यायालयाला केली.

रामोड याचे तपासात असहकार्य

सीबीआयने रामोड याला अटक केल्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत रामोड सहकार्य करत नाहीत. ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा पुनरुच्चार सीबीआय वकिलांनी केला.

Web Title: More than 47 lakhs in 17 accounts of relatives including anil Ramod CBI Raid in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.