पुणे : एक दिवसाआड (तीस टक्के) होत असलेल्या पाणीकपातीमुळे मेटाकुटीला आलेल्या पुणेकरांवर आणखी पाणीकपातीची टांगती तलवार आहे. शनिवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत दौंड, इंदापूर तालुक्याच्या आमदारांनी खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या धरणातील शिल्लक पाणीसाठा पाहता पुणे शहराला सोडून इतर कोठेही पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर भागात पाणी द्यायचे असल्सास पुण्याच्या पाण्यामध्ये कपात करावी लागेल. याबाबत पालकमंत्री येत्या गुरुवारी (दि. २८) निर्णय घेणार आहेत. त्याअगोदर बुधवारी (दि. २७) पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या कालव्यातून होणाऱ्या गळतीची पाहणी पालकमंत्री करणार आहेत. पुणे विधानभवनात बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समिती बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस महापौर प्रशांत जगताप, आमदार राहुल कुल, बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अतुल कपोले यांनी खडकवासला धरण साखळीमध्ये ५.६५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील तीन महिन्यात यातील सुमारे १.३५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. तर पुणे शहराला या धरणांमधून ३.९० टीएमसी पाणी देणार आहे. त्यामुळे धरणांमध्ये केवळ ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. दौंड शहर व जिल्ह्याला ०.५० टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे, अशी माहिती दिली. या वेळी राहुल कुल यांनी दौंडमधील पिण्याचे पाणी संपले आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी केली. पुण्याचे पाणी कोणालाच देणार नाही : महापौर सध्या खडकवासला धरण साखळीमध्ये असलेले पाणी हे पुणे शहराचे हक्काचे पाणी आहे. ग्रामीण भागासाठी जे दीड टीएमसी पाणी मागितले जात आहे ते व्यवहार्य नाही. तसे जर केले तर पुणेकरांना मे महिन्यानंतर पाणीपुरवठा करणे शक्यच होणार नाही. जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे नियम सांगितले त्याचेच आम्ही पालन केले आहे. दौंड व इंदापूरसाठी जे पाणी सोडण्याचा आग्रह केला जात आहे ते पाणी बाष्पीभवन, कालव्यांच्या नादुरुस्ती, मध्येच मोटारपंपाने पाणी उचलणे या साऱ्या बाबींचा विचार करता पोहोचू शकत नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी, हे स्पष्ट होत नाही. सध्या खडकवासला धरणात जे पाणी आहे ते केवळ पुणे शहरालाच लागणार आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. कालव्याची पाहणी : बापट पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून कालव्यातून जो पाणीपुरवठा होतो, त्या कालव्यातून अनेक ठिकाणी पाणीगळती होत आहे. १ फेब्रुवारीला झालेल्या कालवा समितीच्या बैैठकीत पालिकेला ही गळती रोखण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मी स्वत: जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी या गळतीची प्रत्यक्ष पाहणी बुधवारी करणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली. ही पाहणी करून गळती रोखण्यासाठी काय उपययोजना करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने सर्वांचा विचार करावा. तुम्ही मोठे भाऊ आहात. आम्ही लहान भाऊ आहोत. इंदापूरला एक टीएमसी पाणी द्यावे. महापौरसाहेब तुम्हाला पुण्य लागेल. आमच्या मुला-बाळांचे आशीर्वाद लागतील. त्यामुळे आम्हाला पाणी देण्याची भूमिका घ्या. - दत्तात्रय भरणे, आमदार, इंदापूर आमच्या हक्काचे पाणी मागत आहोत. आमच्या जमिनी या धरणांसाठी आम्ही दिलेल्या आहेत. शेतीसाठी पाणी मागत नाही. केवळ पिण्यासाठी पाणी हवे आहे. ते जर मिळणार नसेल तर ते चुकीचे आहे. महानगरपालिका जर नियमाप्रमाणे पाणीवाटप करा म्हणत असेल तर पालिकेलाही पाणी देताना हाच न्याय लावावा. दौडला पिण्यासाठी अर्धा पाणी टीएमसी सोडावेच लागेल. - राहुल कुल, आमदार, दौंड पाणी सर्वांना हवे आहे. पुणेकरांनी हा विचार करावा, की ग्रामीण भागालाही पाण्याची आवश्यकता असते. जिल्हा परिषद व जीवन प्राधिकरणच्या पाणी योजनांना पाणीपुरवठा व्हायलाच हवा. त्याचे नियोजन व्हायला हवे, अन्यथा ग्रामीण भागात आणखी पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. - प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद
जिल्ह्याला आणखी पाणी
By admin | Published: April 24, 2016 4:23 AM