पुणे : शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राज्यभरातील पालकांची झुंबड उडाली आहे. केवळ सहा दिवसांतच राज्यभरातून तब्बल ९० हजारांहून अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २१ हजारांहून अधिक अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत, तर पुण्यासह नागपूर जिल्ह्यात सहा दिवसांतच प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.शिक्षण विभागाकडून दि. ५ मार्चपासून आरटीई प्रवेशाची आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालकांना आरटीईचे संकेतस्थळ किंवा अॅपवरून अर्ज भरण्यासाठी उपलब्ध आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही प्रक्रिया सुरू आहे. राज्यात या प्रक्रियेमध्ये एकूण ९ हजार १९४ शाळांमधील १ लाख १६ हजार ८०३ जागा आरटीईसाठी आरक्षित आहेत. त्यासाठी मागील सहा दिवसांतच ९० हजार ७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १३७ अर्ज अॅपवरून भरण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी दि. २२ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यामुळे सध्याचा प्रतिसाद पाहता प्रवेश क्षमतेपेक्षा अर्जांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे.राज्यात सर्वाधिक १६ हजार ६१६ जागा पुणे जिल्ह्यात आहेत. त्यासाठी २१ हजारांहून अधिक पालकांनी अर्ज केला आहे. ही परिस्थिती नागपूर जिल्ह्यातही आहे. येथील सुमारे ७ हजार जागांसाठी तब्बल सुमारे १३ हजार अर्ज आले आहेत. अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातही उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. तर इतर काही जिल्ह्यांमध्येही पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील काही दिवसांत या जिल्ह्यांतील अर्जांची संख्याही क्षमतेपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हजारो इच्छुक पालकांच्या पाल्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.अनेक जिल्ह्यात प्रतिसादच मिळेनाकाही जिल्ह्यांमध्ये मात्र अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सिंधुदुर्ग व नंदुरबार जिल्ह्यात अनुक्रमे ५० व ९२ अर्ज आले आहेत. ठाणे जिल्ह्यात १३ हजार ४०० प्रवेशांसाठी केवळ ६ हजार ४१९ पालकांनी अर्ज केले आहेत.मुंबईची हीच स्थिती आहे. सुमारे १० हजार जागांसाठी २ हजार अर्ज आलेले आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत हीच स्थिती कायम राहिल्यास मुंबईसह ठाणे व इतर काही जिल्ह्यांतील जागा रिक्त राहतील.
आरटीई प्रवेशाचे पुण्यातून सर्वाधिक अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 2:29 AM