पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अखेर सर्व ४१ प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी पालिकेच्या निवडणूक विभागाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार स्मार्ट सिटी एरिया म्हणून निवड झालेल्या बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वाधिक ९४ हजार ७३ मतदार असणार आहेत, तर सर्वांत कमी मतदार हे प्रभाग ३७ च्या अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये ४० हजार २०२ इतके आहेत. महापालिका निवडणुकीसाठी एकूण २६ लाख ३१ हजार ८८१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या निर्देशानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी २१ जानेवारी रोजी संकेतस्थळावर जाहीर होणे आवश्यक होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने प्रशासनाला ही यादी जाहीर करण्यास विलंब लागला आहे. अंतिम मतदारयादीनुसार १३ लाख ६८ हजार १२१ पुरुष मतदार, तर १२ लाख ६३ हजार ६९३ स्त्री मतदार असणार आहेत.महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी १२ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या प्रारूप रचनेवर ९०९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्याची पडताळणी केल्यानंतर ४६० हरकती योग्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार योग्य त्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक ३०७ इतक्या मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या हरकती आल्या होत्या. तर सर्वांत कमी २२ हरकती घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागामध्ये आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बाणेर-बालेवाडीच्या प्रभागात सर्वाधिक मतदार
By admin | Published: January 25, 2017 2:32 AM