पुणे : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ते व्यक्त करणं गरजेचं नसतं असा सूर अनेकदा आळवला जातो. पण कोरोनाने सर्वांच्याच आयुष्यात प्रेमाचं महत्व पुन्हा अधोरेखित केलं. दूर गेलेली मनं नव्याने एकत्र आणली...त्यांच्यासह लग्न न झालेली किंवा प्रेम असूनही ते व्यक्त न करू शकलेल्यांच्या जोडप्यांना एकत्र येण्यासाठी रविवारी (दि.14) व्हँलेंटाईन डे हा हक्काचा दिवस मिळाला अन एकमेकांना शुभेच्छापत्रे, चॉकलेट, गिफ्टस आणि गुलाब देऊन जोडप्यांनी प्रेमाचा दिनु अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला. दिवसभर प्रेमी युगलांच्या गर्दीने हॉटेल्स, उद्याने, कँफे फुलून गेले होते...
रविवारचा सुट्टीचा दिवस आणि व्हँलेंटाईन डे असा दुहेरी योग जुळून आल्याने जोडप्यांनी हा दिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते. सायंकाळनंतर फगर््युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, चांदणी चौक, कोथरूड यांसह शहराच्या विविध भागांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आवडत्या व्यक्तीला गिफ्टस आणि ग्रिटींग कार्डस देण्यासाठी तरूणाईची पावले दुकानाकडे वळली होती. ’व्हँलेंटाईन डे’चे फॉरवर्डेड मेसेज एकमेकांना पाठवले जात होते. व्हॉटसअपचे स्टेटस आणि डीपी देखील बदलण्यात आले होते. सोशल मीडियावर देखील प्रेमकविता आणि शेरोशायरीचा वर्षाव सुरू होता. कोरोनामुळे गतवर्ष प्रत्येकाचीच परीक्षा पाहाणारे ठरले. एकमेकांना भेटणेही दुरापास्त झाले होते. या काळात अनेकांनी आपला जवळचा व्यक्ती गमावला...त्यामुळे जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत तरी प्रेमाचे क्षण आनंदात घालवायचे याच भावनेतून अनेकांनी हा दिवस सार्थकी केला. ज्येष्ठ नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाता येणे शक्य नसल्याने त्यांनी घरीच हा दिवस संस्मरणीय केला.
-------------------------------------------------------------------------------