मेफेड्रोन बनविण्यासाठी गुजरातला हलविले बस्तान; ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 08:39 PM2020-12-07T20:39:34+5:302020-12-07T20:40:28+5:30
अमली पदार्थांसाठी सुरू करणार होते कंपनी
पिंपरी : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज या अमली पदार्थांच्या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन उघड होत असतानाच त्याचे धागेदोरे बाॅलीवुड तसेच बड्या धेंडांपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांनी रांजणगाव येथील कंपनीत छापा टाकल्यानंतर आरोपींनी गुजरातला बस्तान हलविले. मेफेड्रोन तयार करण्यातसाठी गुजरात येथे आरोपी कंपनी सुरू करणार होते.
पिंपरी-चिंचवडपोलिसांनी मेफेड्रोन प्रकरणात मोठी कारवाई करून २० आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आरोपी यांनी रांजणगाव येथील बंद कंपनीत १३२ किलो मेफेड्रोन बनविले. त्यातील ११२ किलो ड्रग्ज तुषार काळे याने नायजेरियन आरोपी झुबी उडोको याला विक्री केले. राहिलेले २० किलो ड्रग्ज अक्षय काळे विक्रीसाठी घेऊन जात होता. त्यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सापळा लावून आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये झुबी इफनेयी उडोको या नायजेरियनचा समावेश आहे. झुबी एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे.
अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याशी संबंधित अमली पदार्थांच्या एका प्रकरणात राकेश खानिवडेकर हा साक्षीदार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईत मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात तो आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी तुषार सूर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे. ड्रग्ज बनविण्यासाठी तुषार काळे व राकेश याने महाड एमआयडीसीतील एक कंपनी तसेच कर्जत डोंगरगाव येथील एका फार्म हाऊसमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक गिरीष चामले, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनील कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदीप पाटिल, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठ्ठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.