पिंपरी : केंद्र शासनाच्या नदीसुधार योजनेंतर्गत निवडक नदी सुधारणांचा ८३० कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यामध्ये पुण्याच्या मुठा नदीचा समावेश आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पुण्याअगोदर पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य शासनामार्फत केंद्राकडे सादर केलेला पवनेचा प्रकल्प मात्र अद्यापही प्रलंबित आहे. शासनाचे पिंपरी-चिंचवडबद्दल दुजेभावपणाचे धोरण यातून स्पष्ट होत असून, या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मावळ लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांचा पाठपुरावा केल्याची माहिती खासदार बारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाच्या नदी प्रकल्प सुधार योजनेत पवना नदीचा समावेश व्हावा, या दृष्टीने लोकसभेत मुद्दे उपस्थित केले. अधिवेशनात विविध ६२ प्रश्न उपस्थित केले. ३५ वेळा चर्चेत सहभाग घेतला. विविध विषयांवरील ८ खासगी विधयके मांडली. त्यामध्ये कौशल्य विकासावरील प्रशिक्षण प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवीपासूनच्या विद्यार्थ्यांना द्यावे, असे सुचविले. तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा मुद्दा, प्लॅस्टिक कचराबंदी आदी विधेयकांचा समावेश आहे. पवना नदीसुधारणा प्रकल्प राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. ३५० कोटींचा पवनासुधार प्रकल्पाचा प्रस्ताव होता. मात्र, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरेसा निधी उपलब्ध नाही, असे सांगून सुशोभीकरणाचा खर्च कपात करून नव्याने प्रस्ताव द्या, असे सुचवले होते. (प्रतिनिधी)
खासदारांचा सरकारला घरचा आहेर
By admin | Published: August 31, 2016 1:08 AM