Corona Vaccination: पुणेकरांनो लस घ्या! शहरात लाभार्थी कमी अन् लस मात्र मुबलक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:42 PM2021-11-10T16:42:41+5:302021-11-10T16:43:07+5:30
गुरुवारी प्रत्येक केंद्रांवर २५० लसीचे डोस उपलब्ध होणार
पुणे : कोरोना प्रतिबंधक (Corona Vaccination) लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी असलेला ८४ दिवसांचा कालावधी व शहरातील बहुसंख्य नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाल्याने, सर्व केंद्रांवर पुरवठा करण्यात आलेल्या लसपैकी निम्म्याहून अधिक लस शिल्लक राहत आहेत. यामुळे आजमितीला मुबलक लस आहे, पण पात्र लाभार्थी कमी अशी स्थिती शहरात आहे.
राज्य शासनाकडून (State government) महापालिकेला (Pune Mahanagarpalika) दर आठवड्याला साधारणतः ६० हजाराहून अधिक लसीचे डोस पाठविले जात आहेत. यामुळे गुरुवारी ११ नोव्हेंबरला महापालिकेच्या १८७ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( १८ ऑगस्टपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचा १३ ऑक्टोबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.