नगर रोड बीआरटीला २५ एप्रिलचा मुहूर्त
By admin | Published: April 18, 2016 03:04 AM2016-04-18T03:04:26+5:302016-04-18T03:04:26+5:30
नगर रस्त्यावरील बीआरटी बसच्या टर्मिनलसाठी वाघोली येथील अडीच एकर जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्याने अखेर नगर रोड बीआरटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी बसच्या टर्मिनलसाठी वाघोली येथील अडीच एकर जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्याने अखेर नगर रोड बीआरटीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २५ एप्रिल रोजी नगर रस्त्यावरील बीआरटीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग तयार होऊन दोन वर्षे झाले तरी तांत्रिक अडचणींमुळे तो अद्याप खुला करण्यात आलेला नव्हता. बीआरटी बसचे टर्मिनल उभारण्यासाठी जागेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. राज्य शासनाने महापालिकेला वाघोली येथील अडीच एकर जागा दिली होती; मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे त्या जागेचा ताबा मिळण्यात अडचणी येत होत्या. अखेर रविवारी पोलीस बंदोबस्तामध्ये या जागेवरील अतिक्रमण काढून त्याचा ताबा घेण्यात आला.
प्रशांत जगताप यांनी सांगितले , ‘‘जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेच्या मदतीतून वाघोली येथील अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन या दोघांचे मी आभार मानतो. आता उर्वरित कामे पूर्ण करून येत्या २५ एप्रिलपासून बीआरटी कार्यान्वित करू.’’
बीआरटी मार्गावरील बसथांबे व बसमध्ये आयटीएमएस यंत्रणा बसविल्याशिवाय हा मार्ग सुरू करू नये अशी अट केंद्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी पालिकेला घातली होती. त्यानुसार आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
बीआरटी मार्गातून केवळ पीएमपीच्या बसनाच प्रवेश असणार आहे. त्यामुळे इतर वाहनांनी या मार्गात घुसखोरी करू नये याकरिता योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. नगर रस्त्यावरून शहराबाहेरील जड वाहने मोठ्या संख्येने पुण्यात प्रवेश करतात, त्यांना बीआरटी मार्गातून प्रवेश नसल्याचे मोठे फलक त्याठिकाणी लावण्यात येणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पादचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना पार पाडल्या जात आहेत.
बीआरटी मार्गावरील सिग्नल यंत्रणा, पादचाऱ्यांची सुरक्षा, इतर दुरुस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या मार्गावर पुरेशा संख्येने सफाई कामगार व वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. बसचालक व वाहकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.