मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:42 PM2018-11-14T22:42:35+5:302018-11-14T22:43:28+5:30
गंगाराम मातेरे : तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन
भूगाव : मुळशी तालुक्याचे मुख्य पीक हे भातपीक आहे. अवेळी झालेल्या पावसाने भातपीक वाया गेले असून, शेतकऱ्यांच्या हाती चोथा शिल्लक राहिलेला आहे. मुळशी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असते; मात्र या वर्षी पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. तरी शासनाने मुळशी तालुक्यावर अन्याय न करता दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, अशी मागणी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी केले.
मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच केंद्र शासनाने केलेल्या नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही नोटाबंदी फसलेली आहे असे म्हणत पौड तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, महिला अध्यक्ष कांताबाई पांढरे, शिवाजी बुचडे, शिवाजी जांभूळकर, दादाराम मांडेकर, सुरेश पारखी, राहुल जाधव, अविनाश शिंदे, संतोष गायकवाड, शंकर बत्ताले, प्रसाद खानेकर, प्रमोद बलकवडे, सूर्यकांत पारखी, राहुल ओझरकर, रमेश पानसरे उपस्थित होते. या वेळी मातेरे म्हणाले की, केंद्र शासनाने केलेल्या नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असून, हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. युवक अध्यक्ष सुहास भोते म्हणाले की, राज्य शासन अन्यायकारक निर्णय घेत असून, मुळशीवर या शासनाने अन्याय केला असून येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहे. मुळशी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून येथील शेतकºयांचे अश्रू शासनाने पुसावेत. आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन दिले.