पुणे: रोज नवनवी आव्हानं तर सगळ्यांच्या समोर येत असतात पण जेव्हा आव्हान भीषण संकट बनून समोर येतं तेव्हा मात्र माणूस काहीकाळ थिजून जातो. असंच काहीसं घडलंय पुण्यातल्या पाष्टे कुटुंबात. सिरम इन्स्टिट्यूटला काल लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक होता प्रतीक पाष्टे. २१ वर्षांचा, हसरा प्रतीक त्यांच्या घराचे चैतन्य होता. आजारी वडील, चहाची गाडी चालवणारी आई यांना आधार देत त्याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आणि डिग्रीला प्रवेश घेण्याआधीच त्याचा प्रवास संपला. आज संपूर्ण पाष्टे कुटुंब खचून गेलंय. नेहमीसारखा सकाळी कामावर जाणारा प्रतीक आता कायमचा गेलाय.
प्रतीकच्या घरच्यांना या घटनेचा प्रचंड धक्का बसलाय. वडिलांना रुग्णालयात आधीच दाखल केलेले आहे. आणि आता आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. अवघ्या एका खोलीचं घर नातेवाईकांनी भरून गेलंय. त्याच्याकडे वस्तू होत्या म्ह्णून मृतदेह ओळखता आला सांगताना त्याच्या मामांचा स्वर कातर झाला होता. त्याचे मामा गणेश घाणेकर म्हणाले की, 'त्याच्याकडे असलेल्या गोष्टींवरून मृतदेह ओळखता आला. बराच वेळ नेमकं कुठे दाखल केलंय, काय झालंय समजत नव्हतं. अखेर बातम्या बघून प्रतीक नाही हे समजलं. सकाळी मम्मी (आई) निघताना मी कंपनीत जाऊन लवकर येतो सांगणारा प्रतीक असा कायमचा जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं'.
प्रतीकचे मित्र अजूनही धक्यातून बाहेर आलेले नाहीत. रोज भेटणारा मित्र असा अचानक कायमचा निघून गेलाय यावर त्यांना विश्वास ठेवणंही कठीण जातंय. मात्र याही वेळी शासकीय यंत्रणेचा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक तास मृतदेह मिळवण्यासाठी वाट बघावी लागली. इतकेच नव्हे तर २५ लाख देऊन गेलेला माणूस परत येईल का असा प्रश्नच एका मित्राने विचारला.
विजय भोसले हा प्रतीकचा मित्र म्हणाला, 'अतिशय जवळचा मित्र आम्ही आज गमावला. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत नोकरी करून शिकणारा प्रतीक अतिशय सुस्वभावी होता. आमचे एकत्र फोटो बघितले कि तो आता नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही'. उध्वस्त वास्तू पुन्हा उभारली जाईल, धुरामुळे काळवंडलेल्या भिंती नव्याने रंगवता येतील पण घरातला तरुण मुलगा ज्या पाष्टे कुटूंबाने गमावला त्यांचे दुःख कशाने भरून येणार हाच सवाल कायम आहे.