पुणे : मांजरी ब्रूद्रुक येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह शहरात आणण्यास पालिकेच्या अधिकाऱयांनी मज्जाव केला. वास्तविक हा रुग्ण हडपासरमधील प्रभाग क्रमांक २३ मधील रहिवासी होता. येरवडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पास मिळालेला असतानाही हा मृतदेह नेण्यास मनाई करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरोनामुळे कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर मानसिक धक्क्यात असलेल्या कुटुंबियांना पालिकेच्या असंवेदनशील कारभारामुळे आणखीनच मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधीत रुग्णाला कोरोनाची लागण झालेली होती. त्यांना उपचारांसाठी मांजरी बुद्रुक येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावयाचे असल्याने कुटुंबियांनी मयत पास काढला. येरवडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी त्यांना पास देण्यात आला. परंतु, पालिकेच्या कोरोना शववाहिनीचे प्रमुख अरुण जंगम यांनी वरिष्ठ अधिकारा्यांनी सांगितल्या शिवाय ग्रामीण हद्दीतील मृतदेह घेऊन जाणार नाही अशी भूमिका घेतली.
यासंदर्भात नगरसेवक योगेश ससाणे यांनी आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांच्याशी संपर्क साधत मृतदेह शहराच्या हद्दीत आणण्याविषयी विनंती केली. त्यावर बळीवंत यांनी 'पालिकेने ग्रामीण भागातील कोरोना मृतदेहाची जबाबदारी घ्यायची का?' असा सवाल केला. मृत व्यक्ती शहरातील रहिवासी असल्याचे सांगत असतानाच बळीवंत यांनी फोन ठेवल्याचे ससाणे यांनी सांगितले. त्यानंतर ससाणे यांनी खासगी रुग्णवाहिकेमधून मृतदेह येरवडा स्मशानभूमीत नेण्याची व्यवस्था केली. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासन सर्वसामान्यांची अवहेलना थांबवित नाही. अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ससाणे यांनी केली आहे.