पुणे: भारतीय जनता पक्षाची पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर झाली. आता प्रतिक्षा काँग्रेसच्या उमेदवाराची आहे. कसबा विधानसभेची पोटनिवडणुक जिंकून काँग्रेसला विजयाचा गुलाल मिळवून देणारे आमदार रविंद्र धंगेकर काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
भाजपप्रणित महायुतीचे मोहोळ व काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीचे धंगेकर अशी लढत झाली तर ती रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद शिंदे व अन्य काही नावेही आहेत, मात्र चर्चा धंगेकर यांच्या नावाची आहे. मोहोळ व धंगेकर दोघेही महापालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय पटलावर प्रसिद्धीला आले आहेत. मोहोळ सुरूवातीपासून भाजपचे आहेत तर धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काँग्रेस असा झाला आहे. पक्षाचा आदेश असेल तर लोकसभा निवडणुक लढण्यास तयार आहोत असे धंगेकर यांनी जाहीर केले आहे.
मोहोळ यांनी महापालिकेच्याच विसर्जित सभागृहात एकाच पंचवार्षिकमध्ये स्थायी समिती अध्यक्ष व नंतर महापौर अशी दोन पदे मिळवली. त्यातही महापौर म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली. सध्या ते प्रदेश सरचिटणीस म्हणून पक्षाचे काम पाहतात.पक्षाने दाखवलेला विश्वास महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर व्यक्त केली. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हे देशातील जनतेची इच्छा आहे. पुणेकर यात मागे राहणार नाही, तेही मोदी यांच्याबरोबरच असतील असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना कसबा विधानसभेप्रमाणेच पुणे शहर लोकसभाही आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. कसब्याच्या पोटनिवडणुकीत कोणालाही काँग्रेसच्या विजयाचा विश्वास नव्हता, मात्र अखेर काँग्रेसचाच विजय झाला, तसेच लोकसभेसाठीही होणार आहे असे ते म्हणाले होते. काँग्रेसचा उमेदवारही लवकरच जाहीर करू असे त्यांनी सांगितले.