लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोणी काळभोरमधील छत्रपती शिवाजी उद्यान येथील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विजय ऊर्फ गुलशन रोहिदास मोरे (वय २३, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रोहित मोरे यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
विजय मोरे हा मिळेल तेथे मजुरीने खोदकाम करीत होता. त्याला दोन वर्षांपासून दारू पिण्याचे व्यसन होते. विजय हा आईसह राहत होता. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ व पत्नी, मुलगी राहतात. विजय रविवारी रात्री साडेदहा वाजता अर्ध्या तासात जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर गेला होता. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे त्याची आई कांताबाई मोरे यांनी सकाळी रोहित याला सांगितले. रोहित हा त्याला शोधायला बाहेर गेला. तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा विनोद जाधव याने पाण्याच्या टाकीजवळ विजय बेशुद्धावस्थेत पडला असल्याचे सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर रक्त लागलेले होते. लोणी काळभोर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.