Mutha Canal : जमीन खचली अन् संसाराचा झाला चिखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:51 AM2018-09-29T03:51:59+5:302018-09-29T03:52:11+5:30
‘‘सर्वत्र गुडघाभर झालेला चिखल, प्रत्येक घरातील जमीन खचलेली, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, भांडी, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अन् मनात पसरलेले नैराश्य, खिन्न चेहरा आणि पोटात भुकेचा उसळलेला आगीचा डोंब... अशी मन हेलावून टाकणारी विदारक स्थिती दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीत पाहिली,’’ अशा भावना तेथे मदतीला गेलेल्या स्वंयसेवकाने ‘लोकमत’ला सांगितल्या.
- अमोल अवचिते
पुणे - ‘‘सर्वत्र गुडघाभर झालेला चिखल, प्रत्येक घरातील जमीन खचलेली, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, भांडी, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अन् मनात पसरलेले नैराश्य, खिन्न चेहरा आणि पोटात भुकेचा उसळलेला आगीचा डोंब... अशी मन हेलावून टाकणारी विदारक स्थिती दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीत पाहिली,’’ अशा भावना तेथे मदतीला गेलेल्या स्वंयसेवकाने ‘लोकमत’ला सांगितल्या. अनेक संसार उद्ध्वस्त झालेत आणि आता त्यांना पोटासाठी अन्न आणि अंग झाकायला कपडे पाहिजेत. त्यासाठी अनेकांना आवाहन करतोय, असेही हा स्वंयसेवक म्हणाला.
सिंहगड रस्त्यावरील मुठा उजवा कालव्याची भिंत पडल्याने अनेकांचा संसार पाण्यासोबत वाहून गेला. घडलेल्या घटनेमुळे वसाहतीत घबराटीचे वातावरण होते. रात्रीची राहण्याची व्यवस्था मनपाच्या शाळेत केली होती. अनेक सामाजिक संस्था, गणेश मंडळे, नगरसेवक यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली होती. कोणाच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत, तर कोणाचे सगळे घरच पाण्यासोबत वाहून गेले. एका क्षणात सगळा संसार पाण्यात वाहून गेल्याने उद्याच्या काळजीने अनेकांना रात्री झोपच आली नाही. सकाळी उठताच चहापाणी न घेता बेघर झालेल्या नागरिकांनी घराकडे धाव घेतली. दुपारच्या वेळचे जेवणाचे ताट हातात होते, समोर वाहून गेलेला संसार
होता हे सर्व पाहून कोणाच्याही घशाखाली घास उतरत नव्हता. पडलेल्या घरातून कपडे, महत्त्वाची कागदपत्रे, आवडत्या वस्तू शोधण्यात नागरिक गर्क होते.
समोर वाहते पाणी अन् डोळ्यांतही पाणीच...
४काही नागरिक पडलेल्या घराच्या फरशीवर बसून आंबिल ओढ्यामधून वाहणाऱ्या पाण्याकडे हताशपणे बघत होते. जसे पाणी वाहत होते, तसतसे त्यांच्याही डोळ्यांतून पाणी वाहत होते. त्यातच कोणाला स्वत:च्या घरातील भांडी सापडत होती म्हणून आनंदी होत होते, तर कोणी आता काहीच सापडत नव्हते म्हणून दु:खी होते. ज्येष्ठ नागरिक डोक्याला हात लावून कावरेबावरे होऊन डोळ्यातले पाणी पुसत होते. मुलाबाळांच्या वाहून गेलेल्या संसारामुळे त्यांच्या जिवाची घालमेल होत होती.
संसार उभारणार...
1आता काय करायचं हो मॅडम आम्ही ? सगळंच वाहून गेलंय आमचं. जे मिळेल ते गोळा करतोय आणि संसार उभा करतोय... या आर्त भावना दांडेकर पुलालगतच्या झोपडपट्टीतील महिलांच्या आहेत. कॅनॉल फुटल्याने पुलालगतच्या झोपडपट्टीत पाणी शिरल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आजची सकाळ उजाडली आणि सर्वत्र भकास वातावरण दिसून आले.
2येथील कुटुंबीयांना आधार देण्यासाठी के अॅँड क्यू परिवाराचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. त्यांनी येथील नागरिकांच्या चहानाष्ट्याची सोय केली. तेव्हा अनेकांनी आपल्या मनात दाटलेल्या भावना व्यक्त केल्या. येथील महिलांना मानसिक बळ देण्याचे काम या के अॅँड क्यूच्या सदस्यांनी केले व त्यांच्याशी संवाद साधला.
कुठल्या दुरुस्तीची गरज
सर्वच कालव्याच्या भिंती खचल्याने त्या पोकळ झाल्या आहेत.
भिंतीतील माती बाहेर पडून तिचे ढीग
साचले आहेत.
भिंतींमध्ये झाडांची मुळे शिरल्याने त्यांना तडे गेले आहेत.
पुलाच्या खांबांमधील दगड उघडे पडले आहेत.
अनेक ठिकाणी संरक्षक कठडेच नाहीत.