पुणे – पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेला शांतता हवी, मात्र काही लोक द्वेषाचं राजकारण करतात. पाकिस्तानची जनता आपले विरोधक नाही तर जे राजकारण करून लष्कराच्या मदतीने सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते संघर्ष आणि द्वेष पसरवतात. बहुतांश लोक पाकिस्तानात शांतता राहावी या बाजूचे आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केले आहे.
पुण्याच्या कोंढवा परिसरात झालेल्या ईद मिलन कार्यक्रमात शरद पवार सहभागी झाले होते. यावेळी पवारांनी भारत-पाकिस्तान यांच्या नात्यावर भाष्य केले. कुठल्याही नेत्याचं नाव न घेता शरद पवारांनी माजी पंतप्रधान इमरान खान यांचं कौतुक केले. पवार म्हणाले की, पाकिस्तानातील युवा नेता देशाला दिशा देण्याचं काम करत होता परंतु त्याला सत्तेतून बाहेर काढलं गेले असं त्यांनी सांगितले.
इतकेच नाही तर शेजारील राष्ट्र पाकिस्तानात ज्याठिकाणी तुमचे आणि माझे बांधव राहत आहेत. पाकिस्तानची सर्वसामान्य जनता भारताचा शत्रू नाही. तर काही लोक जे राजकारण करत आहेत आणि सैन्याच्या मदतीने सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करतायेत. ते संघर्षाच्या स्थितीत आहे. लोकांना शांतता हवी. कुठलाही धर्म द्वेष करण्यास शिकवत नाही. जाती-पाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्हाला द्वेष नाही तर विकास हवा आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आम्हाला महागाईपासून दिलासा, नव्या पिढीला रोजगार हवाय. आम्ही असं वातावरण बनवू इच्छितो ज्याठिकाणी आमचं राज्य आणि देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जाईल. देशातील लोकांना विकास, रोजगार हवा आहे. परंतु काहीजण जाती-धर्मात तेढ निर्माण करत आहेत. सध्या जगात अजब स्थिती निर्माण झालीय. एकीकडे रशियासारखा ताकदवान देश यूक्रेनसारख्या छोट्या देशावर हल्ला करतोय. तर श्रीलंकेत युवक रस्त्यावर उतरले आहेत. महागाईपासून जनता त्रस्त झाली आहे असंही शरद पवारांनी सांगत ईद झाली, परंतु ईदच्या निमित्ताने आपलं कर्तव्य आहे की, एकता कायम राहिली पाहिजे. ईदसारख्या कार्यक्रमात विविध धर्माचे लोक सहभागी झाले पाहिजेत असंही त्यांनी सांगितले.