मनसे मोर्चाच्या बसवर भाजपा आमदाराचं नाव; मोर्चानिमित्त मनसे-भाजपा कार्यकर्ते एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 09:19 AM2020-02-09T09:19:49+5:302020-02-09T09:21:07+5:30
पुण्यातून मोर्चासाठी निघणाऱ्या बसवर भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांचे नाव असल्याने या मोर्चासाठी भाजपाचंही पाठबळ मनसेला मिळालं आहे का?
पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मनसेचा मोर्चा चर्चेत आला आहे. राज ठाकरेंनी सीएए कायद्याला थेट पाठिंबा दिला नसला तरी कुठेतरी मनसेची भूमिका भाजपाच्या सोयीचं आहे. मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे.
पुण्यातून मोर्चासाठी निघणाऱ्या बसवर भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांचे नाव असल्याने या मोर्चासाठी भाजपाचंही पाठबळ मनसेला मिळालं आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. डेक्कन भागातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत मोर्चासाठी येणार आहे. मात्र या कार्यकर्त्यांसाठी ठेवण्यात आलेल्या गाडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. महेश लांडगे यांच्या पाहुण्यांची ही गाडी आहे असं सांगण्यात येत आहे. तर मनसेच्या या मोर्चासाठी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनाही सहभागी होणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर
दरम्यान, मनसेच्या या मोर्चामागे भाजपाचा हात आहे असा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केला आहे. भाजपाला कधीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येत नाही, त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या कायम लागतात. पहिलं वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आता मनसेला घेतायेत. भाजपाचे आशिष शेलार वारंवार कृष्णकुंजला भेटीगाठी करतात, त्यानंतर हा मोर्चा निघतो, या मोर्चामागे भाजपाचा हात असल्याची शक्यता आहे असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका
मनसेच्या मोर्चाचा मार्ग?
दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.
मनसे मोर्चा लाईव्ह अपडेटसाठी वाचा - MNS Morcha Live: मनसेचा महामोर्चा : मोर्चाच्या बसेसवर भाजपा आमदारांचं नाव, चर्चेला उधाण!