पुणे : शहरातील मेट्राे प्रवाशांना घेऊन फक्त धावणारी मेट्राे नाही, तर तिच्या डब्यांचे रंगरुप अर्थवाही असेल. महामेट्राेने कल्पकतेने त्यातील रंगसंगती तसेच बाह्यदर्शन तयार केले आहे. मुळामुठेच्या पाण्यावरुन व पाण्याखालूनही जाणाऱ्या एका मार्गाचे अॅक्वा व दुसऱ्या मार्गाचे पर्पल असे नामकरण सध्या करण्यात आले आहे.
पुण्याला नवी ओळख देणाऱ्या मेट्राेची प्रत्येक गाेष्ट वैशिष्ट्यपूर्ण व्हावी, यासाठी महामेट्राे कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच मेट्राेच्या संभाजी उद्यान स्थानकाला सतारीचा तसेच त्यापुढच्या स्थानकाला पगडीचा आकार देण्यात आला आहे. अंतर्गत स्वरुप नेहमीसारखेच असले तरी बाह्यरुप मात्र असे वेगवेगळ्या आकारांतले असेल. त्यावरचे रंगही मेट्राेच्या कामाशी, वेगाशी, तिच्या अत्याधुनिकतेशी सांगड घालणारे असतील. या रंगांना तसेच चित्रकारीलाही काही अर्थ राहील, याची काळजी महामेट्राेने घेतली आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये मेट्राेचे डबे नुकतेच रुळावर ठेवण्यात आले आहेत. त्याची चाचणीही लवकरच घेण्यात येणार आहे. नारिंगी, निळ्या, जांभळ्या तसेच हिरव्या रंगांचे पट्टे कलात्मक आकारात मेट्राेच्या डब्यांवर बाहेरच्या बाजूने असतील. यातील नारिंगी रंग म्हणजे कल्पकता, उत्साह, सशक्तपणा, निळा रंग म्हणजे विश्वास, बुद्धिचातुर्य, जांभळा रंग ध्येयासक्त वृत्ती व हिरवा रंग म्हणजे पर्यावरण संवर्धन, जाेपासना असा आहे. मेट्राेच्या सर्व डब्यांवर हेच रंग असतील. त्यामुळे जमिनीच्या वर 18 ते 22 फुटांवरुन धावणाऱ्या मेट्राेचे हे पट्टे आकर्षक दिसतील.
या पट्ट्यांच्या खालील बाजूस पुण्याचे तसेच मेट्राे ज्या भागातून प्रवास करणार आहे, त्या भागाचे वैशिष्ट्य दाखवणाऱ्या वास्तूंची चित्रे असतील. वनाझ ते रामवाडी व पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट असे दाेन मेट्राे मार्ग आहेत. यातील वनाझ ते रामवाडी या मुठेच्या काही भागातून मुठेला समांतर जाणाऱ्या मार्गाचे नाव अॅक्वा असे ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, उद्याेगनगरी पिंपरी- चिंचवडमधून येणाऱ्या मार्गाचे नाव पर्पल असे ठेवण्यात आले आहे. कामाच्या साेयीसाठी तात्पुरते म्हणून असे नामकरण करण्यात आलेले आहे. मात्र त्याला सर्व थरांतून आतापर्यंत तरी चांगली पसंती मिळाली असल्याचे दिसते.