मोदी सरकार अदानी समूहातील गैरकारभाराच्या चौकशीला का घाबरते? नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:01 PM2023-02-06T21:01:27+5:302023-02-06T21:03:29+5:30

राज्यातील एलआयसीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन...

nana patole said Why narendra Modi Govt Fears Adani Group Malpractice Probe | मोदी सरकार अदानी समूहातील गैरकारभाराच्या चौकशीला का घाबरते? नाना पटोलेंचा सवाल

मोदी सरकार अदानी समूहातील गैरकारभाराच्या चौकशीला का घाबरते? नाना पटोलेंचा सवाल

googlenewsNext

पुणे : पंतप्रधान नरेंद मोदी यांचे सरकार हे ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे, असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता, ते खरे ठरले आहे. खासदार राहुल गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या घनिष्ठ संबंधावर बोलत होते. अदानीचा फुगा फुटेल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले होते. उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी करोडो जनतेचा कष्टाचा पैसा अदानीच्या कंपनीत बेकायदेशीर गुंतवला त्याचे परिणाम देशाला व गुंतवणूकदारांना भोगावे लागत आहेत. अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा झाला असताना मोदी सरकार अदानीच्या चौकशीला का घाबरत आहे?, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

पुण्यातील टिळक चौकातील एलआयसी कार्यालयाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रमुख उपस्थितीत अदानी विरोधात निषेध आंदोलन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेचे पैसे मित्र अदानीला दिले, अदानीने आकडे फुगवून एलआयसी, एसबीआयमधले पैसे लुटले. या संस्था लोकांच्या आर्थिक सुरक्षतेसाठी होत्या. मागील ८ वर्षांत अदानी जागतिक पातळीवर थेट दुसऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती बनला. हिंडनबर्ग अहवालातून अदानीचा खोटेपणा उघड झाला; पण मोदी सरकार अदानीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी संस्था मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. हे सरकार लोकशाही मानणारे असेल तर त्यांनी न्याय व्यवस्थेत अडचण आणू नये.

काँग्रेससह इतर विरोधी पक्ष तीन दिवसांपासून संसदेत अदानी गैरकारभारावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत; पण मोदींचे हुकूमशाही सरकार चर्चा करत नाही. जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. आजही काँग्रेस पक्षाने जनतेचा पैसा सुरक्षित राहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, यासाठी राज्यभर आंदोलन केले. अदानीच्या गैरकारभाराची चौकशी होईपर्यंत व जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: nana patole said Why narendra Modi Govt Fears Adani Group Malpractice Probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.