........................................
नैसर्गिक संपत्तीच्या ऱ्हासाबद्दल व्यक्त होतेय चिंता
_________________________
दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नांदोशी हे सिंहगडाच्या पायथ्याशी नैसर्गिक साधनसंपत्तीने विशेषतः गौण खनिजांनी संपन्न असलेले गाव आता वाढते शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणात होत असलेल्या खाणकामामुळे जिल्हाभर चर्चेत आले आहे.
तीन हजार लोकसंख्या आणि 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नांदोशी-सणसनगर ग्रामपंचायत क्षेत्रात नैसर्गिक गौण खनिजांची होत असलेली अतिरिक्त लयलूट आता गावातील नागरिकांना डोईजड ठरत आहे. नांदोशी-सणसनगर मध्ये मोठ्या प्रमाणात दगडांच्या खाणी आहेत. या खाणींतून मर्यादेपेक्षा अधिक खाण उपसा होत असून त्यासंदर्भात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायामल्ली असल्याने गावकऱ्यांना मोठा जाच सहन करावा लागत आहे.
पहाटे तीन वाजेपासून गावात कर्कश आवाजासह खाणकामास सुरुवात होते, त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. त्यातून निघणाऱ्या घातकी धुळीने अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून शासनाने यात लक्ष घालून बोकाळलेल्या अतिरिक्त खाणकामाला आळा घालावा अशी मागणी नांदोशीकरांनी 'लोकमत' कडे केली आहे.
गावात खाणकामासाठी जमिनीत हजारो फुट खोलवर स्फोट घडवले जातात. त्यामुळे गावातील आजूबाजूला घरांची पडझड होत असून जमिनीतील जलसंपदा नष्ट होत आहे.
गावकऱ्यांच्या घरांवर धुळीची चादर साचत असून याचा विघातक परिणाम हा शेतीतील पिकांवर होत असल्याची तक्रार नागरिक करतात. त्याचबरोबर काही नागरिकांनी, तर या विघातक खाणकामामुळे गावातील पक्षी नष्ट झाले आहेत अशी धक्कादायक माहिती देत प्रशासनाकडून या सर्व अवैध कारभाराला कसा आशिर्वाद आहे, याचा पाढा वाचून दाखवला.
_________________________
अतिरिक्त खाणकामामुळे गावातील पक्षी नाहीसे झाले, भुजल शेकडो फुटांपर्यंत खाली गेले असून आता 'गावाला गिऱ्हाईक बघा आणि विका' अशी गत झाली आहे.
-रामचंद्रभाऊ सणस,
सामाजिक कार्यकर्ते
____________________________________
गावात पायाभूत सुविधांसाठी ग्रामपंचायतीमार्फत अनेक विकासकामे सुरू आहेत. महापालिकेत विलीनीकरण झाले तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडू नये ही आमची मागणी आहे.
-राजाराम महादू वाटाणे,
सरपंच, नांदोशी-सणसनगर.
_________________________
pphoto line
नांदोशी सणसनगर गावातील दगडखाणीतील स्फोटांमुळे घरांना तडे जात असून काही नागरिकांच्या घरांची पडझडही झाली आहे.