पुणे/श्रीकिशन काळे : जगभरात मंदीचे सावट आहे. अमेरिकेमध्येही मंदी आलेली आहे. परंतु, त्याची झळ भारताला पोचलेली नाही. कारण आपली आर्थिक स्थिती मजबूत आहे. परंतु, जागतिक मंदीचा फटका आपल्याला जूननंतर होण्याची शक्यता आहे, अशी धोक्याची शक्यता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.
शहरांचा विकास नियोजनबध्द करण्यावर भर दिला जाईल. कारण आता ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. त्यांना पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहेत. पुणे, नागपूर, मुंबई या शहरांकडे जगाचे लक्ष लागले आहे. पुण्याचा विकास गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने झाला आहे. त्याचा अनुभव जी २० मधील देशांना इथे आल्यानंतर मिळणार आहे. शहरांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून जी २० मध्ये चर्चा होईल आणि म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
पुण्यात जी २० परिषदेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी या वेळी या परिषदेविषयी आणि सरकारच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. पायाभूत गुंतवणकीवर या परिषदेत आज व उद्या (दि.१७) चर्चा होत आहे. त्यासाठी जी २० मधील सर्व देशांचे प्रतिनिधी व जागतिक बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
राणे म्हणाले, सध्या जीडीपीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून, भारत पाचव्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो लवकरच येईल. कारण केंद्र सरकारकडून जीडीपी वाढविण्यावर भर दिला जात आहे. २०१४ मध्ये भारत दहाव्या क्रमांकावर होता, आता तो पाचव्या क्रमांकावर येत आहे. आपल्याकडे आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक देखील वाढत असून, त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे, असे राणे म्हणाले.
राणे काय म्हणाले...
- सुंदर शहरे बनविण्यासाठी आपल्याकडे योजना आहेत. त्यानूसार काम केले जात आहे. तसेच त्या योजनांना निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सुंदर शहरांचा भारत हा अभिप्रेत आहे. त्याकडे आपली वाटचाल होत आहे.
- २ लाख कोटी रूपयांचे अनुदान आपण अन्नधान्यासाठी देत आहोत. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही अन्नाविना राहणार नाही, याची शाश्वती सरकार घेत आहे.
- जी २० परिषदेमध्ये पर्यावरण हा देखील विषय आहे. आता देशातील अनेक शहरांत हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. परंतु, पुण्याची हवा चांगली करण्यासाठी भविष्यात यंत्रसामग्रीचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल.
- जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळाचे चित्र आहे. ते कमळ म्हणजे शाश्वत विकास आहे. परंतु, कोणाला जर वाटत असेल की, ते भाजपचे कमळ आहे, तर तसे मानायलाही काहीच हरकत नाही.