नारायणगाव : नारायणगाव-वारुळवाडी गटात जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांची उमेदवारी निश्चित झाल्याने या गटाची लढत लक्षवेधी ठरणार आहे़ राष्ट्रवादीनेदेखील पंचायत समितीचे उमेदवार निश्चित केले आहेत़ जिल्हा परिषद गटातील उमेदवारी येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहे़ नारायणगाव-वारुळवाडी गट सर्वसाधारण महिला राखीव म्हणून आरक्षित झाला आहे, तर नारायणगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व वारुळवाडी गण अनुसूचित जाती आरक्षित करण्यात आला आहे़ या गटात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव काळे जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी नारायणगाव गणातून सुरेखा जाधव व वारुळवाडी गणातून सतीश जाधव विजयी झाले होते़ मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी आपली उमेदवारी निश्चित केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ पंचायत समितीच्या वतीने शिवसेनेकडून वारुळवाडी गणासाठी सुनील गायकवाड, विशाल रणदिवे, योगेश बागूल, गणेश वाव्हळ, रमेश खुडे इच्छुक आहेत, तर नारायणगाव गणासाठी अर्चना माळवदकर यांचे नाव निश्चित झाले आहे़ राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषद गटासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्रीताई बोरकर व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष पूजा मयूर अडसरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे़ पंचायत समितीसाठी नारायणगाव गणातून प्रीती राजेश कोल्हे, तर वारुळवाडी गणातून सुशील सोनवणे यांचे नाव निश्चित झाले आहे़ आशाताई बुचके यांनी २००७ मध्ये नारायणगाव गटातून निवडणूक लढविली होती व त्या विजयी झाल्या होत्या़ त्यांचा पारंपरिक येणेरे-आगार गटामध्ये पुनर्रचना होऊन धालेवाडी तर्फे हवेली-सावरगाव हा गट झाला आहे़ या गटातदेखील त्यांचे वर्चस्व आहे़ मात्र त्यांनी नारायणगाव-वारुळवाडी गट निवडणुकीसाठी निवडला आहे़. मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांची पत्नी सोनाली मकरंद पाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष लढणार की मनसेच्या वतीने लढणार, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही़ तथापि त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. काँगे्रस, आपली आघाडी आपला माणूस व भारतीय जनता पार्टी यांनी अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही़ नारायणगाव-वारुळवाडी गटात नारायणगाव, वारुळवाडी, मांजरवाडी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी आर्वी या गावांचा समावेश आहे़ या गटात एकूण ३६ हजार २३५ मतदार आहेत़ या गटात पुरुष १८८४२ मतदार आहेत, १७६९३ महिला मतदार आहेत़
नारायणगाव गटाची लढत लक्षवेधी
By admin | Published: January 24, 2017 1:42 AM