Narendra Modi in Pune: नरेंद्र मोदी ठरले पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी, मोबाईलवरुन काढलं तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 12:53 PM2022-03-06T12:53:04+5:302022-03-06T12:53:40+5:30
पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर नरेंद्र मोदींनी गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास केला.
पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. मोदी तब्बल पाच तास आज पुण्यात असणार आहेत. या दरम्यान त्यांनी पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रोचे उदघाटन, पीएमपीएलच्या 100 ई-बस आणि ई-बस डेपोचं लोकार्पण केलं. दरम्यान, मोदी हे पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी ठरले आहेत.
Maharashtra | Prime Minister Narendra Modi inaugurates 12 km stretch of total 32.2 km Pune Metro Rail Project pic.twitter.com/YZWfVYTwB0
— ANI (@ANI) March 6, 2022
नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन पार पडलं. मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधानांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली. यानंतर मोदींनी मोबाईलद्वारे मेट्रोचं तिकीट काढलं आणि पुणे मेट्रोचा प्रवास केला. गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशन असा पाच किलोमीटरचा प्रवास पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून केला.
On board the Pune Metro with my young friends. pic.twitter.com/QZi0AL0Uv2
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
मोदींनी दिव्यांगांशी साधला संवाद
या मेट्रोच्या प्रवासात पंतप्रधान मोदींनी काही दिव्यांग शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचीही आस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.