पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 08:58 PM2024-04-29T20:58:33+5:302024-04-29T21:00:19+5:30
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुण्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते.
Amit Thackeray ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला घेतलेल्या मेळाव्यात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता मनसेचे विविध नेते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचं दिसत आहे. राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुण्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात येणाऱ्या पुणे शहर, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील वानवडी इथं नरेंद्र मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील उपस्थित होते. व्यासपीठावर ते भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बाजूला बसलेले पाहायला मिळाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना मुंबई, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण मनसेची सर्वाधिक ताकद याच शहरांमध्ये आहे.
मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका
पुण्यातील आजच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. "ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. ४५ वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षापोटी अस्थिर करण्याच्या खेळाची सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या परिवाराला अस्थिर करत आहेत. १९९५ साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे," अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली.
राज ठाकरेंची कोकणात होणार सभा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालया समोरच्या खुल्या पटांगणावर सभा होण्याची शक्यता आहे. ४ मे रोजी राज ठाकरे कणकवलीला येत आहेत. राज यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात राज यांची सभा व्हावी यासाठी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप आग्रही आहेत. मनसेचा प्रभाव असलेल्या जागांवर राज यांच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. अद्याप याचे वेळापत्रक ठरलेले नसले तरी ४ मे रोजी राज ठाकरे कणकवलीच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते.