नऱ्हे सरपंचाच्या पतीच्या खुन प्रकरणी माजी सरपंचासह आणखी ५ संशयित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:48 PM2019-03-26T13:48:36+5:302019-03-26T13:50:35+5:30
ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या वादातून महिला सरंपचाच्या पतीला मोटारीची धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला़.
पुणे : ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या वादातून महिला सरंपचाच्या पतीला मोटारीची धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला़. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून या घटनेत आणखी एका माजी सरपंचासह ५ जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़.
बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा. नऱ्हे ) हे व्यायामावरुन घरी परत येत असताना १३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता त्यांना एका मोटारीने धडक दिली होती़. त्यात ते गंभीर जखमी झाले होते़. त्यांची पत्नी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याने अपघाताचा बनाव रचून त्यांना धडक दिल्याचे तपासात उघड झाले होते़. भारती विद्यापीठ पोलिसांनी अविनाश कैलास कांबळे व नितीश सतीश थोपटे या दोघांना अटक केली होती़. दरम्यान उपचार सुरु असताना रविवारी दुपारी बाळासाहेब वनशिव यांचा मृत्यु झाला़. त्यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात खुनाचा कलम वाढविले आहे़.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना अविनाश कांबळे व थोपटे यांना मोटार पुरविणारा तसेच एक माजी सरपंच यांच्यासह आणखी पाच जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे़. या गुन्ह्यात आणखी पाच जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांनी सांगितले़.