पुणे : सायबर गुन्ह्यांच्या तपासात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दलचा इंडिया सायबर कॉप पुरस्कार पुणे पोलीस दलातील सायबर सेलला देण्यात आला़ पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील ११ गुन्हे उघडकीस आणले आणि १८ गुन्हेगार जेरबंद केले़ तसेच पुणे शहरात दाखल झालेल्या युपीआय अॅप घोटाळ्यातील ६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या गुन्ह्यांचा चार महिने अविरत तपास करुन गुन्हेगारांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांचा वैशिष्यपूर्ण तपास लावल्या बद्दल नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पुणे पोलिसांना विनरअप ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.डाटा सिक्युरिटी कौंसिल आॅफ इंडिया यांच्यावतीने दरवर्षी बेस्ट एक्सलन्स अॅवार्ड देण्यात येतो. देशभरातील तपास यंत्रणांकडून सायबर गुन्ह्यांबाबत करण्यात येणाऱ्या वैशिष्टपूर्ण तपासासाठी इंडिया सायबर कॉप हा पुरस्कार देण्यात येतो. देशातील तपास यंत्रणांमध्ये अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार समजला जातो. डाटा सिक्युरिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या वतीने १३ ते १५ डिसेंबर दरम्यान वार्षिक माहिती सुरक्षा परिषद नवी दिल्लीत घेण्यात आली़ त्यात हे पुरस्कार वितरित करण्यात आले़ पंतप्रधानांचे सायबर सुरक्षा सल्लागार डॉ़ गुलशन रॉय, डाटा सिक्युरिटी कौन्सिलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रामा वेदश्री, चेअरमन जी़ के़ पिल्लाई, नॅसकॉमचे अध्यक्ष आऱ चंद्रशेखर अध्यक्ष मोहन रेड्डी आदि यावेळी उपस्थित होते़ पुणे पोलिस दलात कार्यरत असताना वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी युपीआय अॅपच्या माध्यमातून होणारा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला होता. यामध्ये तत्कालीन सर्व अधिकारी, कर्मचारी या गुन्ह्यांच्या तपासाचा छडा लावला होता. हा तपास ‘इंडिया सायबर कॉप’ या पुरस्कारासाठी निवडला गेला. या पुरस्कारासाठी देशभरातून २२६ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील तीन प्रवेशिकांची निवडून त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये केरळ, कलकत्ता आणि पुणे पोलिसांचा समावेश होता. या तीन यंत्रणांच्या तपासातून एकाची निवड होणार होती. त्यानुसार पहिले पारितोषिक केरळ पोलिसांना जाहीर झाले तर पुणे पोलिसांना विनरअप ट्रॉफी मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी केलेल्या वैशिष्टपूर्ण तपास राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आला.पुणे पोलिसांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पुणे सायबर विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पुणे पोलिसांच्या ‘सायबर सेल’ला राष्ट्रीय पुरस्कार; युपीआय अॅपचा घोटाळा वैशिष्टपूर्ण तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 4:17 PM
सायबर गुन्ह्यांच्या तपासात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दलचा इंडिया सायबर कॉप पुरस्कार पुणे पोलीस दलातील सायबर सेलला देण्यात आला.
ठळक मुद्देपुणे पोलिसांनी उघडकीस आणले सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील ११ गुन्हेडाटा सिक्युरिटी कौंसिल आॅफ इंडिया यांच्यावतीने दरवर्षी देण्यात येतो 'बेस्ट एक्सलन्स अॅवार्ड'