शुद्ध पाण्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:04 AM2018-06-26T07:04:58+5:302018-06-26T07:05:01+5:30
सिंहगड रोड परिसरातील धायरी गावाला पिण्यासाठी अशुद्ध, दूषित व गाळमिश्रित पाणीपुरवठा करण्यात आल्याच्या निषेधार्थ खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारंगळी मळ्यातील गावविहिरीवरच ठिय्या आंदोलन केले.
धायरी : सिंहगड रोड परिसरातील धायरी गावाला पिण्यासाठी अशुद्ध, दूषित व गाळमिश्रित पाणीपुरवठा करण्यात आल्याच्या निषेधार्थ खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारंगळी मळ्यातील गावविहिरीवरच ठिय्या आंदोलन केले.
महापालिकेत नव्यानेच समाविष्ट झालेल्या धायरी गावातील नागरिकांना सतत दूषित पाणी प्यावे लागते. हे पाणी येथून वाहत जाणाऱ्या उघड्या कॅनॉलमधून थेट या गावविहिरीत सोडण्यात येते. या पाण्यात फक्त ब्लिचिंग पावडर टाकण्यात येते. पाणी शुद्ध करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. या पाण्यात कधी पावडर टाकतात, तर कधी नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे येथील नागरिकांना दूषित व गाळमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे. यामुळे या परिसरातील अनेक लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व नागरिकांना हिवतापसारख्या साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहे. अनेकांना मलेरिया, डेंग्यूची लागण झालेली आहेत. हा सर्व त्रास या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गावविहिरीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दगडखेरे यांना यासंदर्भात निवेदन दिले.