पुणे : श्रमदान करून जे लोक देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहेत, त्यांचा सन्मान होणे अतिशय आवश्यक आहे. मेट्रो हा पुण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये कामगारांच्या श्रमाचे योगदान खूप मोठे आहे. याच हातांनी देशाची प्रगती होते. त्यामुळे कामगार हा देशाचा महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यांच्याकडून राष्ट्र निर्माणाचे बहुमोल कार्य घडत आहे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने कामगार दिनानिमित्त पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोचे काम करणाºया कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, मेट्रोचे दिनेश गर्ग, प्रकाश कदम, संतोष पाटील, अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, योगिनी बागडे, योगेश गोलांडे,गणेश माने, जयवंत मोहने, अमर लांडे उपस्थित होते. पुणे मेट्रोचा पहिला स्तंभ असलेल्या कृष्णा हॉस्पिटल शेजारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भेटवस्तू आणि उपरणे देऊन कामगारांचा सत्कार करण्यात आला. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शहराच्या जडणघडणीत कामगारांचे योगदान मोठे आहे. कामगार अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे काम करीत असतात. परंतु दिवसभर काम केल्यानंतर थकवा घालविण्यासाठी व्यसनांचा आधार घेतात. मात्र त्यांनी व्यसनापासून दूर राहत स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यायला हवी. मंदार रांजेकर यांनी सूत्रसंचालन केले.
श्रमिक वर्गाकडून राष्ट्र निर्माणाचे बहुमोल कार्य :मुक्ता टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:55 PM
राष्ट्रीय कला अकादमीच्यावतीने कामगार दिनानिमित्त पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोचे काम करणाºया कामगारांचा सन्मान करण्यात आला.
ठळक मुद्देमेट्रो कामगारांचा सन्मान कामगार हा देशाचा महत्त्वाचा स्तंभ