बारामती - माळेगाव कारखान्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकीय नाते विळ्या-भोपळ्याचे असल्याचे सर्वश्रुत आहे. शनिवारी (दि. ३) गळीत हंगामाच्या वेळी पार पडलेल्या सभेत गुरु-शिष्याची जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी कारखान्याला राष्ट्रवादीकडून होणा-या विरोधाबाबत आरोपांच्या फै री झाडल्या. दिवाळीच्या तोंडावर गुरु-शिष्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टाकलेले ‘आपटबार’ धमाके बारामती तालुक्याच्या राजकारणावर जाणवणार हे मात्र निश्चित आहे.कारखान्याचे अध्यक्ष रंंजन तावरे म्हणाले, की यावेळी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे पाठबळ असल्याने कारखान्याच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प राबविला. मात्र, त्यांच्या ताब्यातील ‘छत्रपती’ आणि ‘सोमेश्वर’चे विस्तारीकरण होऊनदेखील ‘माळेगाव’ला चुकीच्या पद्धतीने राजकीय विरोधापोटी विरोध केला. पण मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून परवानगी दिली. कारखाना ताब्यात घेतला त्यावेळी कारखान्याचे ९ कोटींचे स्टोअर होते. आत तेच स्टोअर पावणेसहा कोटी आहे.ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे म्हणाले, की कारखान्याचे १९१७-१८ मध्ये विस्तारीकरण करताना अनेक अडचणी आल्या. १९६७ मध्ये बारामती तालुक्यात पूर्व-पश्चिम भाग असे. त्यामध्ये पश्चिम भागात काकडे यांचे वर्चस्व होते, तर पूर्व भागात कोणाचा कोणाला पायपोस नव्हता. पश्चिम भागात त्या काळात मोठी दहशत होती. तरीदेखील माळेगावचा संपूर्ण माळेगाव परिसरासह जिरायती भाग ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मागे राहिला. प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिले. मात्र, आज माळेगाव कारखान्याचे विस्तारीकरण करायचे म्हटले, तरी माणसे अंगावर येतात. त्यांच्या ताब्यातील इतर कारखान्यांचे विस्तारीकरण झाले. मात्र, ज्या भागातील लोकांनी त्यांच्यासाठी जिवाचे रान करून त्यांना कारभारी केले. त्या भागातील लोकांची पिढी भिकारी झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. काळ त्यांना कधीही माफ करणार नाही. माळेगाव कारखान्याच्या सभासदांना एफआरपीपेक्षा वाढीव दर दिलेला आहे. मात्र, यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी एफआरपीपेक्षा वाढीव दर देणाºया साखर कारखान्यांना इन्कमटॅक्स लावला. अडचणीच्या काळात सहकारमंत्री, पालक मंत्री आमच्या पाठीशी उभे राहिले. शेतकºयांना कमी भाव देणाºयांनीच हल्लाबोल मोर्चे काढले, पण जनता आता दूधखुळी राहिलेली नाही. यापूर्वीच्या सरकारने कोणताही विचार केला नाही. मात्र, भाजपाच्या सरकारने शेतात राबणाºया मजुरापासून शेतकºयाचा विचार केल्याचे तावरे म्हणाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी माळेगाव कारखाना आदर्शच राहील. कोणीही कितीही तंगड्या ओढल्या तरी उपयोग होणार नाही, अशा शब्दांत पाठिंबा व्यक्त केला. खासदार अमर साबळे यांनी, माळेगावच्या सभासदांच्या प्रपंचाला कोण नख लावतेय, कोण अडथळा करत आहे. चंद्रराव तावरे कोणाची कपडे उतरविली, हे सर्वांच्याच लक्षात आले. आता निवडणुकीतदेखील त्यांची कपडे उतरवायची आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, की आघाडी सरकारमधील मंडळी त्यावेळी आंदोलन करणाºयांना कारखाना चालवून दाखवावा, असे म्हणत होती. मात्र, आमच्याबरोबर आंदोलन करणाºया रंजनकुमार तावरे यांनी माळेगावच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एफआरपीपेक्षा गतवर्षी ३०० रुपये भाव दिला. मात्र जे आरोप करीत होते त्यांच्या साखर कारखान्यांनी एफआरपीदेखील दिली नाही. यापूर्वीच्या सरकारमधील नेत्यांनी संस्था काढायच्या, त्याचे अनुदान लाटून त्या संस्था अडचणीत आणून बंद पाडण्याचे काम केले, असा आरोप खोत यांनी केला. दरम्यान, गुरु-शिष्यांनी फोडलेल्या फटाक्यांची कारखाना परिसरात चर्चा होती.
गुरू-शिष्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ‘आपटबार’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 1:14 AM