पुणे : परदेशी दौऱ्यावरून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना त्यांच्या एकजुटीवरून लक्ष्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षातील घराणेशाही आणि घोटाळ्यांचे आरोप यावरून मोदींनी पवारांवर टीका केली होती. या टीकेला पवारांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. "पंतप्रधान यांनी माझ्या पक्षाबद्दल मत व्यक्त केले. पण माझी मुलगी स्वत:च्या कर्तुत्वाने आहे. ती लोकांमधून निवडून आली असून संसदेत तिचे काम उच्च दर्जाचे आहे", अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधानांनी घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका केली होती. "सुप्रिया सुळे यांचे भले करायचे असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मतदान करा", असा उपरोधिक टोला मोदींनी लगावला होता. यावर बोलताना पवारांनी म्हटले, "पंतप्रधानांनी माझ्या पक्षाबद्दल मत व्यक्त केले. माझी मुलगी स्वत:च्या कर्तुत्वाने इथे आहे. ती लोकांमधून निवडून आली आहे आणि संसदेत तिचे काम उच्च दर्जाचे आहे. मतदार एकदा मत देईल पण काम नसेल तर कोणी मत देणार नाही. त्यामुळे असे मत त्यांनी व्यक्त करणे योग्य नाही."
तसेच राज्यात जातीय, धार्मिक वातावरण तयार केले जात आहे. कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला इथे दंगली झाल्या. जाती धर्माच्या नावाखाली रस्त्यावर येऊन दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले. कायदा सुव्यवस्था परिस्थिती काय आहे हे स्पष्ट दिसत असल्याची टीका पवारांनी केली. राज्यातील २४५८ मुली बेपत्ता"राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा झाला आहे. पुण्यामधून ९३७ मुली बेपत्ता आहेत, ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८, सोलापूरमधून ६२ मुली अशा एकूण २४५८ मुली बेपत्ता आहेत. १४ जिल्ह्यात एकूण ४४३१ मुली, महिला बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा याकडे लक्ष दिले पाहिजे", असा टोलाही पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.