‘राष्ट्रवादी’ म्हणते ५१५ सरपंच आमचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:20+5:302021-01-21T04:12:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच पक्षाचे वर्चस्व असल्याचे जाहीर करण्यात सर्वच पक्षांमध्ये जोरदार चढाओढ लागली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच पक्षाचे वर्चस्व असल्याचे जाहीर करण्यात सर्वच पक्षांमध्ये जोरदार चढाओढ लागली आहे. यात जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ५१५ ग्रामपंचायतीत आमचेच सरपंच असतील, असे स्पष्ट केले. शिवसेनेने आम्ही जिल्ह्यात दोन नंबरचा पक्ष असल्याचे सांगत काँग्रेस-भाजपला आव्हान दिले आहे.
जिल्ह्यातील २०२ ग्रामपंचायतींवर भगवा फडकेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. आरक्षित जागावरील बहुतेक सर्व उमेदवार काँग्रेसचे असल्याचे सांगत जिल्ह्यात १४३ ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच होतील व पन्नास टक्के ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही, असा विश्वास काँग्रेसला आहे. तर इतर पक्षांसारखे आम्ही नुसते पोकळ दावे करत नाही तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींची सदस्यनिहाय यादी तयार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका पार पडल्या. यात ९५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ६४९ ग्रामपंचायतीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यात ‘आम्हीच कसे वरचढ’ हे सांगण्यासाठी जोरदार चढाओढ लागली आहे. यात थेट आजी-माजी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपासून ते प्रादेशिक आणि गल्लीतल्या नेते-पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
याबाबत ‘लोकमत’ने सर्व प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची संवाद साधला. तेव्हा जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायती असताना सर्व जिल्हाध्यक्षांनी छातीठोकपणे केलेल्या दाव्यानुसार संबंधित पक्षांच्या सरपंचांची बेरीज थेट १ हजार ६३ च्या घरात गेली. यातली वस्तुस्थिती येत्या दीड महिन्यात स्पष्ट होईल.
कोट
“जिल्ह्यात आजही राष्ट्रवादी काँग्रेसच एक नंबरचा पक्ष असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जिल्ह्यातल्या ७४८ पैकी ५१५ ग्रामपंचायतीत आम्हाला स्पष्ट बहुमत असून, येथे आमचेच सरपंच होतील.”-
प्रदीप गारटकर , जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कोट
“यावेळी शिवसेनेने चांगली मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातल्या २०२ ग्रामपंचायतींवर यंदा भगवा फडकणार हे नक्की. शिवसेना जिल्ह्यातील दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. अनेक ग्रामपंचायतीत आमच्या मदतीने महाआघाडीला सरपंचपद मिळेल.”
-रमेश कोंडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
कोट
“इतर पक्षांसारखे आम्ही केवळ पोकळ दावे करत नाही तर मावळ, केड, शिरूर, दौंड, इंदापूरसह जिल्ह्यात तब्बल २०० ग्रामपंचायतींमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या ग्रामपंचायतींची सदस्यनिहाय आमची यादी तयार असून, कुणाच्याही मदतीशिवाय येथे आमचे सरपंच सत्तेवर येतील.”
-गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष, भाजप
कोट
“जिल्ह्यातल्या १४३ ग्रामपंचायतींमध्ये आमचे निर्विवाद वर्चस्व आहेच. याशिवाय आरक्षित जागांवर आमच्या पक्षाचे सदस्य निवडून आले असल्याने सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आमच्या मदतीशिवाय ‘महाआघाडी’चे पान हलणार नाही.”
-आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस